Pimpri Crime News : स्पर्श संस्थेकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकारावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रुग्णांना महापालिकेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देण्यासाठी लाखो रुपये घेतल्याप्रकरणी चर्चेत असलेल्या स्पर्श हॉस्पिटलच्या एका डॉक्टरला पाच लाखांची खंडणी मागितल्याबाबत एका दैनिकाच्या वरिष्ठ पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने पिंपरी चिंचवड महापालिकेचे ऑटो क्लस्टर येथील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल चालवण्यासाठी घेतले होते. या कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी स्पर्शच्या डॉक्टरांनी रुग्णांकडून लाखो रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणाचे महापालिकेच्या सभागृहात देखील पडसाद उमटले. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन एका महिला डॉक्टरसह चार डॉक्टरांना अटक झाली. लाखो रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली. याची गंभीर दखल घेऊन महापालिका आयुक्तांनी स्पर्श संस्थेकडून ऑटो क्लस्टर येथील कोविड हॉस्पिटलचा ताबा काढून घेतला.

त्यानंतर फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल होळकुंदे यांनी बुधवारी (दि. 12) पिंपरी पोलीस ठाण्यात एका दैनिकाच्या एका वरिष्ठ पत्रकाराच्या विरोधात खंडणीची फिर्याद दिली. त्या पत्रकाराने पाच लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप डॉ. होळकुंदे यांनी केला आहे.

खंडणी न दिल्यास स्पर्श विरोधात बातम्या देण्याची धमकी पत्रकाराने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने त्या पत्रकाराला पाच लाख रुपये देण्याचे ठरवले. त्यानुसार दोन लाख रुपये रोख आणि तीन लाख रुपये बँक खात्यावर पाठवण्यात आले असल्याचे देखील फिर्यादीत म्हटले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.