Pimpri Crime News : व्यावसायिक आनंद उनवणे अपहरण आणि खून प्रकरणातील आरोपीला अटक

30 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरीमधील एफएफआय चिटफंड कंपनीचे मालक आनंद साहेबराव उनवणे (वय 42, रा. मोरवाडी, पिंपरी) यांचे तीन फेब्रुवारी रोजी अपहरण करून चार फेब्रुवारी रोजी खून केला. या प्रकरणातील एका आरोपीचे वडील लाखोंची मालमत्ता घेऊन पसार झाले होते. त्यांना बंगळुरू शहरातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम, असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सुधीर मारुती मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. यापूर्वी पोलिसांनी बाबू उर्फ तुळशीराम पोकळे, उमेश सुधीर मोरे, सागर दत्तात्रय पतंगे, दीपक धरमसिंग चंडालिया, राकेश राजकुमार हेमनानी, कपिल ज्ञानचंद हासवानी, प्रवीण नवनाथ सोनवणे या सात जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन फेब्रुवारी रोजी व्यवसायिक आनंद उनवणे यांचे आरोपींनी अपहरण केले. त्यानंतर त्यांचा चार फेब्रुवारी रोजी खून केला. आनंद उनवणे यांचा मृतदेह पाच फेब्रुवारी रोजी महाड परिसरात आढळला. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल दोन हजार पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सात आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून 49 लाख 61 हजार 338 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

दरम्यान आरोपी उमेश मोरे याचे वडील सुधीर मोरे या गुन्ह्यातील मुद्देमाल घेऊन फरार झाले. पोलीस सुधीर मोरे याच्या मागावर होते. सुधीर मोरे हा बंगळुरू येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सुधीर मोरे याला अटक केली. आरोपी सुधीर मोरे हा वेशांतर करून वेळोवेळी जागा बदलत असे. आरोपीने पाच महिन्यांच्या कालावधीत केवळ 18 कॉल केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. कॉल केल्यानंतर आरोपी मोबाईल बंद करून फिरत असे. आरोपी बंगळुरूशहरातील नागवारा येथील मुस्लिमबहुल झोपडपट्टीवजा दाट लोकवस्तीत राहत होता. तिथून पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपी सुधीर मोरे याच्याकडून 387.940 ग्रॅम वजनाचे 17 लाख 45 हजार 730 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख 43 हजार 600 रु रुपये रोख रक्कम असा 27 लाख 90 हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

तसेच या गुन्ह्यातील मुख्य आरोपी प्रभू पुजारी याच्या पत्नीने त्यांच्या वाट्याला आलेल्या रकमेपैकी सहा लाख 14 हजार 700 रुपये रोख रक्कम आठ जुलै रोजी पिंपरी पोलिसांकडे सादर केली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 83 लाख 66 हजार 768 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.