Pimpri Crime News : व्यावसायिक आनंद उनवणे यांचे खुनासाठी अपहरण; चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पिंपरीतील चिटफंड व्यावसायिक आनंद साहेबराव उनवणे (वय 42) यांचे तीन ते चार जणांनी मिळून खुनासाठी अपहरण केल्याचा गुन्हा पिंपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. उनवणे यांचे 3 फेब्रुवारी रोजी पिंपरीतून अपहरण झाले. त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी त्यांचा मृतदेह महाड येथे सापडला. याबाबत 8 फेब्रुवारी रोजी खुनासाठी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर अर्जुन चव्हाण यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मयत आनंद उनवणे यांचा चिटफंडचा व्यवसाय आहे. ते 3 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा दहा वाजता राहत्या घरातून बेपत्ता झाले. दरम्यान त्यांच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली होती. पिंपरी पोलिसांचा तपास सुरू असतानाच रायगड मधील महाड येथे शनिवारी (दि. 6) त्यांचा मृतदेह आढळला.

आनंद उनवणे 3 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये असताना एका कारमधून तीन ते चारजण आले. आरोपी आणि आनंद यांच्यात झटापट झाली. त्यानंतर आरोपींनी आनंद यांना कारमध्ये जबरदस्तीने बसवून त्यांचे पैशांच्या हव्यासापोटी अपहरण केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची सहा पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचेही पथक समांतर तपास करीत आहे. या प्रकरणातील काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. मात्र, उनवणे यांचे अपहरण आणि खून कोणत्या कारणासाठी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींना बेड्या ठोकल्यानंतर हे कारण स्पष्ट होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.