Pimpri Crime News : फी भरण्यावरून विद्यार्थ्याला कथित मारहाण प्रकरणात कॉलेजच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा; कर्मचाऱ्याची विद्यार्थ्याविरोधात फिर्याद

एमपीसी न्यूज – फी भरण्याच्या कारणावरून पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्रचार्यांच्या केबिनमध्ये वाद झाला. विद्यार्थ्याने त्याला कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच्या परस्पर विरोधात कॉलेजच्या कर्मचाऱ्याने देखील विद्यार्थ्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास पिंपरी येथील महात्मा फुले महाविद्यालयात घडली.

शुभम कैलास बारोठ (वय 24, रा. बालाजीनगर, भोसरी) या विद्यार्थ्याने गुरुवारी (दि. 30) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयूर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) आणि त्याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम बुधवारी सकाळी फी भरण्यासाठी व त्यांचा स्वतःचा मास कम्युनिकेशन पदवीच्या शेवटच्या वर्षाचा निकाल घेण्यासाठी कॉलेजमध्ये गेले होते. फी भरण्यावरून शुभम आणि कॉलेजचे प्राचार्य यांच्यात वाद झाला. त्यानंतर शाळेतील शिपाई असलेल्या आरोपींनी शुभम यांना प्लास्टिकची खुर्ची आणि लथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. यात शुभम जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याच्या परस्पर विरोधात सुरेश गणपत देसाई (वय 51, रा. पिंपरी गाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम कैलास बारोठ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे परिचर म्हणून काम करतात. बुधवारी सकाळी शुभम आणि प्राचार्य यांच्यात फी भरण्यावरून बोलणे चालू असताना शुभम याने फी न भरण्याच्या व फी माफ करण्याच्या कारणावरून काचेच्या दरवाजावर स्वतःचे डोके आपटले. दरवाजाची काच फोडून स्वतः जखमी होऊन फिर्यादी यांना जखमी केले आहे. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.