Pimpri Crime News : मालकाच्या घरातून 60 लाख रुपये पळवणारा कुक जेरबंद

एमपीसी न्यूज – मालकाच्या घरातून कुकने 60 लाख रुपये चोरुन पसार झाल्याची घटना अँथिया सोसायटी, पिंपरी येथे 28 एप्रिल रोजी घडली होती. या चोरीतील मुख्य आरोपीसह त्याच्या आरोपी वडिलांना पोलीसांनी जेरबंद केले आहे.

मुख्य आरोपी अनोदकुमार राजकुमार यादव (वय 28, रा. बाराबंकी, उत्तरप्रदेश) व राजकुमार मुनीश्वर प्रसाद यादव (वय 54, रा. मिना मार्केट, इंदिरानगर, लखनऊ), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अजित संजयकुमार राजहंस (वय 31, रा. महिंद्रा अँथिया सोसायटी, गांधीनगर झोपडपट्टी समोर, पिंपरी) यांच्या घरात आरोपी अनोदकुमार राजकुमार यादव हा कुक म्हणून कामाला होता.

_MPC_DIR_MPU_II

आरोपी अनोदकुमार याने बनावट चावीच्या सहाय्याने लाकडी कपाटात कामगारांच्या पगारासाठी ठेवलेली 60 लाख रुपये चोरले. त्यानंतर तो पसार झाला. याबाबत अजित यांनी 29 एप्रिल रोजी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

गुन्ह्यातील आरोपीच्या तपासासाठी पिंपरी पोलीसांची टिम लखनऊ येथे दाखल झाली. गाजीपूर पोलीस ठाण्यात मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचे वडील व भाऊ यांची चौकशी केली असता त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आरोपीचे वडील राजकुमार मुनीश्वर प्रसाद यादव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून रोख रक्कम 99 हजार 500 रुपये जप्त करण्यात आली.

पिंपरी पोलिसांच्या दुसऱ्या टिमने तांत्रिक माहितीच्या आधारे व स्थानिक पोलीसांच्या मदतीने गुन्हयातील मुख्य आरोपी अनोदकुमार राजकुमार यादव याला सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 44 लाख 70 हजार रूपये जप्त करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील 60 लाख पैकी 45 लाख 69 हजार 500 रुपये जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.