Pimpri Crime News : जॅकेट खरेदीवरुन वाद; परस्पर विरोधी गुन्हे दाखल; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – जॅकेट विक्री करणा-या तरुणाला एकाने हप्ता मागितला. त्यासाठी तरुणाने नकार दिला असता हप्ता मागणा-याने जबरदस्तीने जॅकेट घेऊन त्याचे पैसे देण्यास नकार दिला. तसेच आपल्या चार साथीदारांना बोलावून जॅकेट विक्री करणा-या तरुणाला मारहाण केली. जॅकेट विक्रेत्या तरुणाने देखील त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून हफ्ता मागणा-या तरुणाला बेदम मारहाण केली.

ही घटना शनिवारी (दि. 5) सायंकाळी सहा वाजता खराळवाडी बस स्टॉपजवळ पिंपरी येथे घडली. याबाबत परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वप्निल संजय कांबळे (वय 28, रा. आदर्शनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी साहिल अहमद शेख (वय 21, रा. पिंपरी) आणि त्याचे दोन मित्र याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

स्वप्निल याने दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादी शनिवारी सायंकाळी सहा वाजता दुचाकीवरून खराळवाडी येथून जात होते. खराळवाडी बस स्टॉपजवळ त्यांच्या ओळखीचा आरोपी साहिल जॅकेट विकताना दिसला. त्यामुळे स्वप्निल यांनी आरोपी साहिल यांच्याकडून जॅकेट खरेदी केले. त्यानंतर जॅकेटच्या पैशांवरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून आरोपींनी स्वप्निल यांना लोखंडी पट्टी सारख्या वस्तूने मारून गंभीर जखमी केले.

याच्या परस्पर विरोधात साहिल अहमद शेख (वय 21, रा. पिंपरी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार स्वप्निल कांबळे, धर्मेश पाटील, सोनू पारच्या, राज चौरे, राशिद खान (सर्व रा. पिंपरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी धर्मेश, सोनू आणि राशिद यांनी फिर्यादी यांना खराळवाडी येथे धंदा करण्यासाठी दररोज एक हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी स्वप्नील दुचाकीवरून आला. त्याने फिर्यादी यांच्याकडून जॅकेट घेतले आणि त्याचे पैसे दिले नाहीत.

फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून ‘कोणी मध्ये पडले तर खांडोळी करून संपवून टाकीन’ अशी धमकी दिली. राशिद याने फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजार 800 रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.