Pimpri Crime News : कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेणाऱ्या तीन डॉक्टरांना चार दिवसांची पोलीस कोठडी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या तीन डॉक्टरांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकवाडी येथील पदमजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (3) उल्हास जगताप (वय 55, रा. सुखवानी उद्यान, लिंक रोड, चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19 एप्रिलमध्ये सुरेखा वाबळे यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना वाल्हेकरवाडी येथील ऑक्सिकेअर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध नसल्याने अन्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातेवाईकांनी इतरत्र शोधाशोध सुरु केली. त्या दरम्यान बालाजी मोरे यांनी ओळखीचे डॉ. सचिन कसबे याच्याशी संपर्क साधून आयुसी बेडसाठी 1 लाख रुपयांची मागणी केली.

त्यानंतर डॉ. कसबे याने पद्मजा हॉस्पिटल, वाल्हेकरवाडी येथील डॉ. शशांक राळे यांच्या मार्फत कोविड सेंटरच्या डॉ. प्रविण जाधव याच्याशी संपर्क केला. मात्र, कोणतीही प्रक्रिया पार न करता महापालिकेच्या ऑटोक्लस्टर येथे बेड उपलब्ध झाल्याचे सांगून रुग्णास तेथे बोलावून घेतले. त्यानुसार डॉ. कसबे याने मध्यस्थी राहूल काळे या व्यक्तीमार्फत एक लाख रुपये पद्मजा रुग्णालयसमोर घेतले.

सर्वप्रथम ‘एमपीसी न्यूज’ने बातमी प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडली. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर हालचाली झाल्या. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. त्या तिघांवर खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 मे रोजी आरोपींना अटक केली असून न्यायालयाने आरोपींना 6 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मयत रुग्णाला ऑटोक्लस्टर येथे दाखल करताना रुग्णाच्या हातात सोन्याच्या दोन अंगठ्या होत्या. रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मिळून आल्या नाहीत. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. कोविड सेंटरमध्ये मौल्यवान साहित्य गहाळ होण्याचे प्रकार झाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. कृष्ण प्रकाश : पोलीस आयुक्त. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.