Pimpri crime News: पिंपरीतील ‘त्या’ मारहाणीच्या घटनेचा फेरतपास करण्याचे गृहमंत्र्यांचे आश्वासन

 नगरसेवक डब्बू आसवानी यांची माहिती; पोलीस आयुक्तांची बदली तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी दोन राजकीय पक्षांच्या गटांमध्ये भांडण झाले. याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पिंपरी-चिंचवड पोलीस योग्य रीतीने करीत नसून हा तपास पोलिसांकडून काढून तो सीआयडीकडे द्यावा. तसेच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली करावी, अशी मागणी माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी केली आहे.

याबाबत आसवानी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी (दि. 25 ऑगस्ट) निवेदन दिले.

याबाबत बोलताना आसवानी यांनी सांगितले की, आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांना भेटून या घटनेची पार्श्वभूमी सांगितली. त्यानंतर गृहमंत्र्यांनी या गुन्ह्याचे फेर तपासाचे आदेश देऊ. तसेच या घटनेचा तपास संबंधित तपास अधिका-याकडून काढून दुस-या अधिका-याकडे देऊ, असे आश्वासन दिले आहे.

सन 2019 विधानसभा निवडणूकीच्या दिवशी हा प्रकार घडला असून याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये फिर्यादी यांनी जबाब देताना चार जणांनी मारहाण केल्याचे नमुद केले होते.

परंतू, चार्जशिट दाखल करताना पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई व सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांनी आसवानी कुटूंबियांतील अकरा व इतर नातेवाईक चार व्यक्तींची नावे त्यात दाखल केली आहेत.

यामध्ये माझे थोरले बंधू राजू आसवानी तसेच धनराज आसवानी हे आजारपणामुळे घरातून बाहेरही जात नाहीत. त्यांची देखील नावे तपास अधिका-यांनी चार्जशीटमध्ये दाखल केली असल्याचे आसवानी यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त हे बेकायदेशीर धंदे करणा-यांना पाठीशी घालत आहेत, तसेच बांधकाम व्यावसायीकांकडून हप्ते घेत आहेत. त्यासाठी त्यांनी निलंबित पोलीस अधिका-याची नेमणूक या तपासासाठी केली आहे.

त्यांच्या काळात पिंपरी चिंचवडचा ‘युपी’, ‘बिहार’ झाला आहे. या घटनेतील तपासाबाबत एकतर्फी निर्णय घेणा-या पोलीस आयुक्त व सहाय्यक आयुक्तांची पुणे जिल्ह्यातून बदली करावी, अशी मागणी करणारे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी असेही पत्र संबंधित विभागात दिले असल्याचेही आसवानी यांनी सांगितले.

आसवानी कुटूंबियांवरील अन्याय दुर न झाल्यास आपण उच्च न्यायालयात जाणार असल्याचे आसवानी म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.