Pimpri crime News : तोडफोड, वाहनचोरी, शस्त्र बाळगण्यासह विनयभंगाच्या घटनांमध्ये होतेय वाढ

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यासमोर वाढते गुन्हे रोखण्याचे आव्हान

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – ‘अनलॉक’ सुरु झाल्यानंतर मेट्रो शहरांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील मागील काही दिवसांपासून चोरी, घरफोडी, दुकान व वाहनांची तोडफोड, मारामारी, विनापरवाना शस्त्र बाळगणे (पिस्तूल, गावठी कट्टे), विनयभंग, खंडणी वसुली अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. वाढत्या गुन्हेगारीमुळे सामान्य नागरिक धास्तावलेला आहेत. नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची तडफदार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख आहे. मात्र, शहरातील या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता देशात लॉकडाउन लागू करण्यात आला. उपासमारी, बेरोजगारी आणि नागरिकांची होणारी गैरसोय यामुळे टप्याटप्याने देशात अनलॉक करत बंधने शिथिल करण्यात आली. या अनलॉक सोबतच मेट्रो शहरांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले.

पिंपरी चिंचवडमध्ये मागील पाच दिवसांची (30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर) आकडेवारी पाहता चोरी, घरफोडी, दुकान व वाहनांची तोडफोड, मारामारी, विनापरवाना शस्त्र बाळगणे (पिस्तूल, गावठी कट्टे), विनयभंग, खंडणी वसूल करणे यासारख्या गुन्ह्यात वाढ झाल्याचे दिसून येते.

मागील पाच दिवसांत शहरात चोरीचे 22 गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये वाहन चोरी आणि इतर चोऱ्यांचा समावेश आहे. घरफोडीचे 3 गुन्हे दाखल आहेत. विनापरवाना शस्त्र बाळगणे यामध्ये पिस्तूल, गावठी कट्टे, लोखंडी व धारदार शस्त्रे बाळगणे याचे चार, तर चार विनयभंगाच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हिंजवडी परिसरात 29 नोव्हेंबरला एक आणि निगडीत 2 डिसेंबरला एक असे दोन खून झाले आहेत. तसेच, इतर बेकायदेशीर विनापरवाना दारू विक्री, अपहरण, मारामारी, खंडणी वसूल करणे यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे.

देशात जसजसे अनलॉक होईल तशी गुन्हेगारी वाढेल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. कोरोना काळात पोलीस यंत्रणेवर ताण होता हे निश्चित. मात्र, परिस्थिती पूर्वपदावर येत असताना गुन्हेगार मोठ्याप्रमाणावर पुन्हा सक्रिय झाल्याचे वाढलेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांना गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांची कर्तव्यतत्पर अधिकारी म्हणून ओळख आहे. त्यांनी शहरातील अवैध धंद्यांना चांगलाच चाप बसवला आहे. कामचुकार, अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी बस्तान मांडून बसलेल्या अधिकारांच्या त्यांनी बदल्या केल्या आहेत.

कर्तव्यात कामचुकारपणा आणि सर्वसामान्य नागरिकांशी न्याय वागणूक न देणाऱ्या चिंचवड ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकालाही त्यांनी निलंबित केलं आहे. त्यातून ‘कामात कसूर कराल तर गय केली जाणार नाही’ असा इशाराच त्यांनी दिला आहे.

शहरातील अवैध धंद्याला चाप बसला असला तरी शहरात चोरी, घरफोडी, तोडफोडीच्या घटना, सोनसाखळी चोरी, विनापरवाना शस्त्र बाळगणे, छेडछाडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी प्रसिध्दी झोतापासून थोडंसं दूर राहून अवैध धंद्यांप्रमाणे गुन्हेगारीला आळा घालावा, अशी अपेक्षा पिंपरी चिंचवडकरांकडून व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.