Pimpri Crime News : गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या जामीनासाठी बनावट कागदपत्रे तयार करून चक्क न्यायालयाची दिशाभूल

दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय कागदपत्रे तयार करणारी एक टोळी पिंपरी परिसरात सक्रिय होती. या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे चक्क न्यायालयाची दिशाभूल केली. पिंपरी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात सहा जणांना अटक केली आहे.

पहिल्या गुन्ह्यात सुनील मारुती गायकवाड (वय 52, रा. चावडी चौक, आळंदी), नंदा एकनाथ थोरात (वय 43, रा. इंद्रायणी नगर, आळंदी), पौर्णीमा प्रशांत काटे (वय 30, रा. इंद्रायणी नगर, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई रोहित सुधाकर पिंजरकर यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर दुसऱ्या गुन्ह्यात सलमान ताजुद्दीन मुजावर (वय 24), समाधान प्रभाकर गायकवाड (वय 23), श्रीधर मगन शिंदे (वय 23, सर्व रा. काटे चाळ दापोडी) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलीस शिपाई उमेश वानखडे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपी शिवाजीनगर कोर्ट पुणे आणि इतर कोर्टामध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, पॉक्सो यांसारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करून देण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करत असत. त्यामध्ये आधार कार्ड, रेशनिंग कार्ड, सातबाराचे उतारे अशी शासकीय दस्तऐवज जामीन मिळवून देण्यासाठी तयार केली जात.

जे आरोपी जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा कोर्टाच्या कामासाठी हजर राहणार नाहीत अशा आरोपींना जामीन देण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट नावे धारण करून ठराविक व ओळखीच्या वकिलांच्या मागणीनुसार कोर्टात जामीनदार म्हणून हजर केले जात असे. त्याआधारे आरोपींना कोर्टातून जामिनावर सोडले जात असत.

आरोपींनी न्यायालयाची दिशाभूल करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील अटक आरोपींचा जामीन करून घेण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वारंवार वापर केला आहे. बनावट नावाची बोगस कागदपत्रे पिंपरी न्यायालय येथे बोगस जामीनदार म्हणून हजर राहण्यासाठी आरोपींनी स्वतःजवळ बाळगली आहेत. हे प्रकरण मंगळवारी (दि. 15) दुपारी पिंपरी परिसरात उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक करून दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.