Pimpri Crime News : घरात 2 खून करुन पत्नीचे अपहरण केलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका व्यक्तीने मेव्हणा आणि सासऱ्याचा खून केला. आजे सासऱ्यावर खुनी हल्ला करून पत्नीचे अपहरण करून तिला पिंपरी चिंचवड शहरात आणले. या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली.

रवि सुरेश पर्वतकर (वय 23, रा. महावीर कॉलनी, अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मेव्हणा धनंजय साबळे, सासरा बंडू साबळे अशी खून झालेल्यांची नावे आहेत. आजे सासरा विश्वनाथ साबळे असे खुनी हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

आरोपी रवी हा 14 फेब्रुवारी रोजी त्याची पत्नी हर्षा हिला घेण्यासाठी सासुरवाडीमध्ये कुरडपुर्णा, ता. चांदुर बाजार, जि. अमरावती येथे गेला असता तेथे त्याचे किरकोळ कारणावरुन सासरच्या लोकांशी भांडण झाले.

त्या भांडणाच्या कारणावरून त्याने त्याच्या जवळील चाकूने त्याचा सासरा बंडु साबळे, मेव्हणा धनंजय साबळे यांचा खून केला. सासऱ्याचे वडील विश्वनाथ साबळे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच त्याची पत्नी हर्षा हिला जबरदस्तीने घेऊन पळवून अमरावती येथून ट्रॅव्हल्सने पुणे येथे आला.

आरोपी रवी मोशी परिसरात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी रवीला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.