Pimpri : विक्रीसाठी आणलेले सात पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज – मोशी परिसरात गावठी पिस्तुलाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सात गावठी पिस्तुले व 28 काडतूसे हस्तगत केली. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने ही कामगिरी केली.

योगेश बाजीराव दौंडकर (वय 35, रा. शेल पिंपळगाव, ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काळ्या रंगाच्या दुचाकीवर एकजण मोशी परिसरात पिस्तुल विक्रीसाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी संशयित व्यक्तीला सापळा रचून ताब्यात घेतले.

त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला एक पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसे मिळाली. तसेच त्याच्या जवळ असलेल्या दुचाकींची तपासणी केली असता डिकीमध्येही लाल रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेले एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे मिळून आली. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने विक्री करता आणलेली आणखी पाच पिस्तुले चांदुस कोरेगाव ता. खेड येथील फार्महाऊसमधून हस्तगत करण्यात आली. पोलिसांनी आरोपी दौंडकर याच्याकडून एकूण सात पिस्तुले व 28 काडतुसे असा एकूण 2 लाख 29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.