Pimpri Crime News : त्यामुळे आरोपी दहा वर्षे राहिला बेपत्ता…

एमपीसी न्यूज – एखाद्या गुन्ह्याचा तपास सात वर्षानंतर बंद होतो, अशी माहिती कोणीतरी आरोपीला दिली. त्यामुळे लग्नाचा तगादा लावणाऱ्या गरोदर प्रेयसीचा खून करून तो दहा वर्ष बेपत्ता राहिला. मात्र, पोलिसांनी दहा वर्षांनंतर त्याला अटक केली.

किशोर लक्ष्मण घारे (रा. डोणे, ता. तावळ, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चांदणी सत्यवान लांडगे (वय 22, रा. बलदेवनगर झोपडपट्टी, पिंपरी) असे खून झालेल्या प्रियसीचे नाव आहे.

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी येथील एका कंपनीत चांदणी आणि किशोर दोघे काम करत होते. तिथेच त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यानच्या काळात चांदणी गरोदर राहिल्याने तिने आरोपी किशोर याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. त्या तगाद्याला कंटाळून किशोर याने चांदणी हिचा खून करण्याचा निर्णय घेतला.

आरोपी किशोर हा 2011 मध्ये चांदणी हिच्या घरी गेला. आपण लग्न करू, असे सांगून त्याने चांदणी हिला अज्ञात स्थळी नेले. ओढणीने तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर चाकूने तिचे मुंडके धडावेगळे करून मुंडके एका ठिकाणी आणि धड दुसऱ्या ठिकाणी दरीत टाकले.

चांदणी हिचा खून केल्यानंतरही आरोपी किशोर याने फोन बंद ठेवला. त्यानंतर चांदणीच्या आईने संपर्क केला असता दोन वर्ष तो वेगवेगळी कारणे देत राहिला. मात्र मुलीचा संपर्क होत नसल्याने चांदणीच्या आईने मुलगी बेपत्ता असल्याची फिर्याद दिली. ही माहिती मिळाल्यावर आरोपी किशोर याने स्वतःच्या घरात भांडणाचे नाटक केले आणि तो घरातून निघून गेला.

सात वर्षानंतर गुन्ह्याचा तपास बंद होतो, अशी माहिती कोणीतरी आरोपी किशोर याला दिली. त्यानंतर तो दहा वर्ष बेपत्ता राहिला. त्यानंतर तो पुन्हा आला आणि दोन महिन्यापासून मारूंजी भागात भाजी विक्रीचा व्यवसाय करू लागला. तो भाजी विकत असल्याची माहिती वाकड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा केला.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.