Pimpri Crime News : भाजप नगरसेविकेसह अकरा जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा; सर्वांना अटक

एमपीसी न्यूज – भाजप नगरसेविका आशा शेडगे यांच्यासह अकरा जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका अधिकाऱ्याच्या खुर्चीवर फुले आणि शाई टाकली. तसेच आयुक्तांच्या नामफलकावर शाई फेकल्याबाबत पोलिसांनी अकरा जणांना ताब्यात घेतले होते. हा प्रकार गुरुवारी (दि. 9) दुपारी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात घडला. गुन्हा दाखल केल्यानंतर सर्वांना अटक करण्यात आली आहे.

नगरसेविका आशा तानाजी धायगुडे / शेडगे, समर्थक पूजा अरविंद भंडारी, शीतल पंकज पिसाळ, गौरी कमलाकर राजपाल, आशा जैसवाल, शीतल महेश जाधव, जयश्री रामलिंग सनके, संध्या रमेश गवळी, स्वप्नील भारत आहेर, संजय शंकर पवार, संजय शेडगे (सर्व रा. कासारवाडी, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रमोद रामकृष्ण निकम (वय 52, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंगावर शाई टाकण्याच्या उद्देशाने नगरसेविका शेडगे आणि त्यांच्या अन्य समर्थकांनी आपसात कट रचून शासकीय अधिकारी अशोक मारुती भालकर यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीवर फुले आणि काळी शाई टाकली. तसेच टेबलावर ‘धिक्कार’ असे लिहिले.

महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर बेकायदेशीर जमाव जमवून आयुक्तांना व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी दालनातून बाहेर पडण्यास अटकाव केला. सुरक्षा रक्षक तसेच पोलिसांना धक्काबुक्की करून आयुक्तांच्या दालनाच्या भिंतीवर लावलेल्या नावाच्या पाटीवर काळी शाई फेकली. महापालिकेमध्ये मोठमोठ्याने ओरडून पालिकेच्या दैनंदिन शासकीय कामात अडथळा निर्माण केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकारानंतर पिंपरी पोलिसांनी नगरसेविका शेंडगे यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 341, 120 ब, 141, 143, 147, 149, 188, 269, कोविड उपाययोजना कलम 51 ब, साथरोग अधिनियम कलम 3 नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती पलांडे तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.