Pimpri Crime News : पिंपरी, चिंचवड, चाकणमध्ये तीन घरफोड्या; एक लाख 84 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – पिंपरी, चिंचवड आणि चाकणमध्ये घरफोडीच्या तीन घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी एक लाख 84 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

नेहरूनगर, पिंपरी मधील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर असलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये चोरीचा पहिला प्रकार घडला. 4 जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा ते साडेतीन वाजण्याच्या काळात अज्ञात चोरट्यांनी कोविड सेंटरमध्ये उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून 60 हजारांचा एक लॅपटॉप चोरून नेला.

याबाबत हिना आमरत बरारिया (वय 28, रा. पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडीचा दुसरा प्रकार इंदिरानगर, चिंचवड येथे घडला. याप्रकरणी प्रकाश पदमाकर सोनार (वय 37) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यात चोरट्यांनी 40 हजारांचा एक सोन्याचा हार, 15 हजारांचे सोन्याचे कानातले, आठ हजारांची रोकड असा एकूण 63 हजारांचा ऐवज घराचे कुलूप तोडून चोरून नेला आहे.

घरोफोडीचा तिसरा प्रकार निघोजे येथील सॅनी कंपनीच्या रेस्ट हाऊसमध्ये घडला. श्रीकांत विजयराव देशमुख (वय 38, रा. मोशी) यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अज्ञात चोरट्यांनी रेस्ट हाऊसच्या पाठीमागील खिडकीवाटे आत प्रवेश केला. रेस्ट रूममधून 38 हजारांचे सिटीझन कंपनीचे मनगटी घड्याळ, 23 हजारांचा चेरेबन कंपनीचा चषमा असा एकूण 61 हजारांचा ऐवज चोरून नेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.