Pimpri Crime News : कोविड रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये घेतल्याप्रकरणी तीन डॉक्टरांना अटक

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकाकडून एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तीन डॉक्‍टरांना अटक केली आहे. 

स्पर्श प्रा. लि.चे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे अतिरिक्‍त आयुक्‍त (3) उल्हास जगताप (वय 55, रा. सुखवानी उद्यान, लिंक रोड, चिंचवड) यांनी रविवारी (दि. 2) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी पहाटे 3.43 वाजताच्या सुमारास सुरेखा अशोक वाबळे (रा. रामदास नगर, चिखलीगाव) यांना ऑटो क्‍लस्टर येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणले होते. या रुग्णालयात दाखल करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसताना आरोपींनी सुरेखा यांच्या नातेवाइकांकडून बेड मिळवून देण्याच्या उद्देशाने धमकावून अ‍ॅडमीट करण्यासाठी पैसे लागतात, अशी फसवणूक केली.

सुरेखा यांच्या नातेवाईकांकडून आरोपी डॉ. प्रवीण जाधव याने एक लाख रुपये घेतले. त्यातील कट प्रॅक्‍टीस म्हणून वीस हजार रुपये पद्मजा हॉस्पिटलच्या दोन्ही डॉक्‍टरांना दिले. उपचारादरम्यान सुरेखा यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पालिकेकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.