Pimpri Crime News : विशीतील तरुणांचा सोसायटीत धुडगूस ; ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला मारहाण करत लुटले, गाड्यांच्या काचा फोडल्या

एमपीसी न्यूज – विशीतील तरुणांनी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडून जबरदस्तीने 8 हजार रूपये काढून घेतले. तसेच, त्याच सोसायटीच्या काचा, सीसीटीव्ही आणि फिर्यादी यांच्या चारचाकीची तोडफोड केली. आरोपींनी फिर्यादी यांच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या तीन ट्रकवर दगड मारून त्यांचे नुकसान केले. शिवसाई पार्क, यशवंतनगर या ठिकाणी शुक्रवारी (दि. 05) रात्री अकराच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी पाच तरुणांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी आरोपी रोहित मुकिदा पवार (वय 19, रा. भोसरी) व अविनाश नागनाथ माने (वय 20, रा. भोसरी) यांना अटक करण्यात आले आहे. तर, शंकर चौधरी (वय 20, यशवंतनगर, पिंपरी) व आणखी दोन आरोपी यांच्याविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी ट्रान्सपोर्ट व्यावसायिक रामशंकर उदयराज गुप्ता (वय 55, रा. शिवसाई पार्क सोसायटी, यशवंतनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामशंकर शुक्रवारी (दि. 05) रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या पटवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ऑफिस बंद करून राहत्या शिवसाई पार्क सोसायटीत पोहचले. त्यावेळी सोसायटीच्या पार्किंगमध्ये थांबलेल्या आरोपींनी त्यांना लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांच्या खिशातील 8000 रूपये काढून घेतले. आरोपींनी सोसायटीच्या काचा फोडून तिथे लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडला. फिर्यादी यांच्या (एमएच 14 / डीटी 9813) या चारचाकीच्या काचा फोडल्या.

त्यानंतर आरोपी फिर्यादी यांच्या पटवा ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचे ऑफिस समोर पोहोचले. त्याठिकाणी पार्क केलेले (एमएच 14 / सीपी 7113), (एमएच 14 / जीयु 7813) व (एमएच 14 / बीजी 0943) या ट्रकवर दगडफेक करून त्याच्या काचा फोडल्या व दहशत निर्माण केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सूर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.