Pimpri Crime News : तरुणाच्या खून प्रकरणी आरपीआयचा माजी शहराध्यक्ष अध्यक्ष सुरेश निकाळजे अटकेत

एमपीसी न्यूज – काठीने मारहाण करून एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला दोघांना अटक केली. त्यांनतर पोलिसांनी आरपीआयचा (आठवले गट) माजी अध्यक्ष सुरेश ऊर्फ चिम्या निकाळजे याला मंगळवारी (दि. 10) अटक केली आहे. त्याला बुधवारी (दि. 11) न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

मनोज राजू कसबे (वय 25, रा. मिलिंद नगर, पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी काळ्या उर्फ सचिन निकाळजे (वय 40), शौकत समीर शेख (वय 32, दोघे रा. मिलिंदनगर, पिंपरी) या दोघांना अटक केली. त्यानंतर मंगळवारी आरपीआयचा माजी शहराध्यक्ष चिम्या ऊर्फ सुरेश निकाळजे याला अटक करण्यात आली आहे.

अटक केलेल्या आरोपींसह मनोज अर्जुन जगताप, आनंद कदम, संतोष कदम, भूषण डुलगल व त्यांच्या इतर साथीदारांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत मनोज यांच्या आई पुष्पा राजू कसबे (वय 50, रा. पिंपरी) यांनी रविवारी (दि. 8) याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, आपल्यावर अज्ञात व्यक्‍तीने काठीने हल्ला केल्याचा कांगावा चिम्या निकाळजे याने पोलीस आयुक्‍तांसमोर केला होता. आरोपी चिम्या याची परिसरात दहशत असल्याने 5 ऑगस्ट रोजी गुन्हा घडूनही याबाबत तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. मात्र, मनोज याच्या मृत्यूनंतर चिम्यासह इतर आरोपींच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.