Pimpri Crime News: शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटर तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यावसायचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे उघडकीस येत आहे. पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकामार्फत दररोज कारवाई होत आहे; मात्र, यामुळे हा प्रकार नियंत्रणात येण्याऐवजी अधिक वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हे प्रकार रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

शहरात मोठं मोठे मॉल्स, शॉपिंग सेंटरमध्ये स्पा सेंटर तसेच मसाज पार्लरच्या नावाखाली अवैध पद्धतीने वेश्याव्यावसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागामार्फत याठिकाणी छापे टाकून वेश्याव्यावसाय चालकांना अटक केली जात आहे.

तसेच, जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या महिलांची सुटका केली जाते. अशा अवैध पद्धतीने सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलीस कारवाई करत आहेत पण, सेक्स रॅकेट चालवणा-या टोळ्यांवर जरब काही केल्या बसत नसल्याचे दिसून येत आहे.

वाकड, हिंजवडी, निगडी, चिखली, चिंचवड तसेच शहरातील इतर भागात मागील काही दिवसांत अवैध वेश्याव्यवसायावर कारवाई करण्यात आली. मॉल्स, शॉपिंग सेंटर्समध्ये स्पा व मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असतो. याठिकाणी लोकांची मोठी गर्दी पहायला मिळते.

अशा ठिकाणी ग्राहक सहज बळी पडतात. शहराची कामगार नगरी म्हणून ओळख आहे.  सहाजिकच याठिकाणी मोठ्या प्रमाणावर कामगार राहतात. रोजगारासाठी बाहेरून आलेले अनेक जण यांचे ग्राहक होतात.

यामध्ये परदेशी नागरिकांचा देखील समावेश असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवाईतून दिसून आले आहे. पोलिसांसमोर अवैध पद्धतीने सुरू असणाऱ्या वेश्याव्यावसायाला आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे. मॉल्स, शॉपिंग सेंटर्समध्ये स्पा व मसाज सेंटरसाठी जेव्हा जागा दिली जाते. तेव्हा मॉल्स, शॉपिंग सेंटर्सच्या संबंधित अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करणं देखील तितकेच गरजेचे आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कृष्ण प्रकाश यांनी शहरातील अनेक अवैध धंद्यांना जरब बसवली आहे. झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत शहरात कोणतीही अवैध गोष्ट खपवून घेतली जाणार नाही.

अशी कोणतीही घटना निदर्शनास आली तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे. असे असताना अवैध वेश्या व्यावसायाचा सुळसुळाट सुरु आहे. अवैध वेश्याव्यवसाय हद्दपार करण्यासाठी पोलीस आयुक्तांना अधिकचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.