Pimpri: ‘जुन्याच ताटाला नवीन ‘कल्हई’, अर्थसंकल्पावर गटनेत्यांची टीका

लोकहिताचा नव्हे तर स्व:हिताचा अर्थसंकल्प-विरोधकांची टीका; यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन प्रकल्प नाहीत

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2019-20 या आर्थिक वर्षांचा मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6, 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.18 ) स्थायी समितीला सादर केला. दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प नाहीत. जुन्याच ताटाला नवीन ‘कल्हई’ केली आहे. लोकहिताचा नव्हे तर स्व:हिताचा अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली. तर, सत्ताधा-यांनी सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला असल्याचे सांगत त्याचे कौतुक केले.

मनसेचे गटनेते सचिन चिखले: – ”अर्थसंकल्पात कोणतेही नवीन प्रकल्प हाती घेतले नाहीत. आहे त्याच बजेटवर पुन्हा एकदा रकमा ठेवल्या आहेत. शिक्षणासाठी काहीच तरतूद केली नाही. शिक्षणाकडे सत्ताधा-यांचे लक्ष दिसत नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाकडे नवीन ‘व्हिजन’ दिसत नाही. शिलकीचा अर्थसंकल्प आहे. 13 हजार कोटी शिल्लक असताना कोणत्याही नाविन्यपूर्ण योजना सुरु केल्या नाहीत. यातून भाजपचे ‘व्हिजन’ दिसत नाही. पिंपरी-चिंचवडकारांनी हे लक्षात घ्यावे”.

  • शिवसेना गटनेते राहुल कलाटे: – ”यंदाच्या अर्थसंकल्पात नावीन्य काही नाही. कर्जरोखे विकून निधी उभारण्याची गरज पडत आहे. शहराच्या आर्थिक दृष्टिकोनातून हे चांगले नाही. महापालिकेकडे ठेवी आहेत. ठेवीचे व्याज याचे गणित करुन व्यवस्थित नियोजन केल्यास कर्जरोखेची सुरुवात होऊ शकतो. कर्जरोखेतून कर्जाकडे जायला नको. याची दक्षता घेणे आवश्यक आहे. निवडणूक असतानाही अर्थसंकल्पात नवीन काहीच केले नाही. निवडणुकीमुळे वेगळे काही असेल अशी अपेक्षा होता. परंतु, निराशा झाली आहे. करवाढ केली नाही. त्याचे स्वागत आहे”.

विरोधी पक्षनेते दत्ता साने: – ”यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन एकही प्रकल्प नाही. अर्थसंकल्पात कोणतेही मोठे प्रकल्प घेतले नाहीत. नवीन, धोरणात्मक एकही काम नाही. मग कसला अर्थसंकल्प आहे. त्याला काहीच अर्थ नाही. 1391 कोटी आरंभीची शिल्लक आहे. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढे शिलकीचे बजेट आहे. एवढी रक्कम शिल्लक राहणे हा भाजपचा नाकर्तेपणा आहे. भाजपला बजेट खर्च करता आले नाही. सत्ताधारी आणि प्रशासनाने दोनवर्षात लोकहिताची कामे करण्यापेक्षा स्व:हिताची जास्त कामे केली आहेत. लोकहिताचा नव्हे तर स्व:हिताचा हा अर्थसंकल्प आहे. दोन वर्षात सत्ताधा-यांनी काही कामे केली आहेत, हे जाहीर करावे. जुन्याच ताटाला नवीन ‘कल्हई’ केली आहे”.

  • सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार: – ”अर्थसंकल्पात आयुक्तांनी प्रत्येक गोष्टीला निधी ठेवला आहे. सर्वांगीण विकासासाठी केलेला अर्थसंकल्प आहे. मेट्रो, स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना, नदी सुधार योजना यासारख्या सर्व प्रकल्पांना निधी ठेवला आहे. सर्वांगीण विकासाबरोबरच समाविष्ट गावातील विकासासाठी तरतूद ठेवण्यात आली आहे. यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीने हा अर्थसंकल्प तयार केला आहे. या अर्थसंकल्पाचा अभ्यास करुन शहरातील राहिलेल्या उर्वरित प्रकल्पासाठी तरतूद ठेवण्याबाबत सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.