Pimpri: नातू गमावलेल्या आज्जीचा महापालिकेत हंबरडा; कचरा वाहतूक करणा-या वाहनाची धडक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या खासगी ठेकेदाराच्या वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील पाच वर्षाचा बालक दगावला. तर, वडील मृत्यूशी झुंज देत आहेत. या अपघातामुळे नातू गमावलेल्या आणि मुलाचा मृत्यूशी संघर्ष पाहणा-या आईने महापालिकेत येऊन टाहो फोडला. गंभीर जखमी असलेल्या मुलाला वाचवा, अशी आर्त याचना प्रशासनाकडे केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास महापालिका मुख्यालयासमोर घडला.

अर्णव शिवशंकर सोलबने (वय 5 वर्षे रा. नागेश्वरनगर, मोशी) असे अपघातात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. तर, वडील शिवशंकर सोलबने हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मोशी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • याप्रकरणी कचरागाडीवरील चालक सचिन सुदाम कांबळे (वय 28, रा. मोरेवस्ती, चिखली) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अर्णवचे काका राहुल ओमकार सोलबने (वय 25)यांनी भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा अपघात गुरुवारी (दि. 19) रात्री बाराच्या सुमारास मोशीतील गोडावून चौकत घडला.

सोलबने कुटुंबिय मूळचे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील आहे. उदरनिर्वाहासाठी ते पिंपरी-चिंचवड शहरात आले असून मोशीत वास्तव्यास आहेत. फिर्यादी राहुल यांचा पुतण्या ऋद्र हा आजारी होता. त्याचे वडील शिवशंकर हे दुचाकीवरुन त्याला उपचारासाठी भोसरीत रुग्णालयात घेऊन गेले होते. उपचार करुन घरी जात असताना मोशीतील गोडावून चौकात समोरुन येणा-या महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या वाहनाने जोरात धडक दिली. त्यामध्ये अर्णव याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर, शिवशंकर यांच्या डोक्यास, हातास जबर मार लागला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मोशीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

  • या अपघातामुळे नातू गमावलेल्या आणि मुलाचा मृत्यूशी संघर्ष पाहणा-या आज्जीने, मुलाच्या आईने आज महापालिकेत येऊन टाहो फोडला. गंभीर जखमी असलेल्या मुलाला वाचवा, अशी आर्त याचना प्रशासनाकडे केली. माजी महापौर मंगला कदम यांनी मुलाच्या आज्जीला, आईला धीर दिला. महापालिका आयुक्तांकडे घेऊन गेल्या. शिवशंकर सोलबने यांचा जीव वाचविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. उपचाराचा खर्च महापालिकेने करावा, असे आयुक्तांना सांगितले.

दोषीवर कठोर कारवाई करणार
आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने आरोग्य अधिका-यांना बोलावून घेतले. शिवशंकर सोलबने यांच्यावर उपचार करावेत. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या. तसेच अपघाताची चौकशी केली जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.