Pimpri : सायबर क्राईम – गुन्हेगारीची स्मार्ट पद्धत (भाग दोन)

शिकली सवरलेली लोकं सुद्धा फसतात सायबर क्राईमच्या जाळ्यात

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – सायबर गुन्हेगारी समजून घेतल्यानंतर तिची व्याप्ती आणि सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात सहजासहजी कोण अडकतात, याची माहिती घेणं आवश्यक आहे. माहिती तंत्रज्ञान संसाधने आणि इंटरनेट ज्या गोष्टींशी निगडित आहे, त्या गोष्टींशी सायबर गुन्हेगारी निगडित आहे. सोशल इंजिनिअरिंग, फिशिंग, स्पॅम ई मेल, हॅकिंग, नोकरी लग्नाचे आमिष दाखवून आणि बँकेशी निगडित असणा-या काही बाबी यामध्ये येतात. महिला, लहान मुले आणि अशिक्षित नागरिक याचे सहज शिकार होतात. मात्र, हल्ली शिकली-सवरलेली लोकं सुद्धा सायबर अपराधांची शिकार झालेली अनेक उदाहरणे समोर येत आहेत.

लोकांनी त्यांची गोपनीय माहिती सांगण्यासाठी गुन्हेगारांकडून विशिष्ट कला वापरली जाते. कोणत्यातरी गोष्टीचे आमिष दाखवून ती विकण्याच्या, भेट म्हणून देण्याच्या बहाण्याने नागरिकांना भुरळ घातली जाते. फोन, ई मेल, व्यक्तिशः माहिती घेऊन त्या माहितीच्या आधारे फसवणूक केली जाते. स्पॅम ई मेल या प्रकारात संगणक आणि मोबाईलला हानी पोहोचवणारे ई मेल पाठवून गोपनीय आणि व्यक्तिगत माहिती चोरली जाते. प्रसंगी संगणक आणि मोबाईलला हानी देखील पोहोचवली जाते. फिशिंग हा देखील ऑनलाईन फसवणुकीचा एक प्रकार आहे. मूळ संकेतस्थळासारखे बनावट संकेतस्थळ बनवून त्यावर नागरिकांनी भेट दिली असता त्यांची माहिती घेतली जाते. बनावट लिंक मेसेज आणि सोशल मीडियावरून पाठवून त्याद्वारे माहिती घेऊन फसवणूक केली जाते.

अर्जंट जॉब आहेत. त्यासाठी मुलाखत घेतली जाणार असून मुलाखतीला येण्यापूर्वी आपली माहिती पाठवा. प्रोसेसिंग फी आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली खोटी आश्वासने दाखवून बँक अकाउंटवर पैसे मागवून घेतले जातात. पैसे मिळाल्यानंतर पुढे कोणताही संपर्क केला जात नाही. अज्ञात संकेतस्थळाकडून नोकरीची ऑफर आल्यास प्रथम त्याची सत्यता पडताळून घ्यावी. लॉटरीच्या नावाखाली ऑफर मिळाल्यास सावधगिरी बाळगावी. लॉटरीची रक्कम मिळण्यासाठी ऍडव्हान्स पैसे भरू नये. अज्ञात ई मेलमधील संलग्न फाईल किंवा लिंक उघडताना काळजी घ्यावी.

सध्या अनेक विवाह साईट आल्या आहेत. सायबर गुन्हेगार आपली खरी ओळख लपवून त्यावर आपली खोटी माहिती देऊन आकर्षक प्रोफाइल तयार करतात. त्या प्रोफाइलला पाहून एखाद्या व्यक्तीने प्रतिसाद दिल्यास आरोपीकडून लग्न करण्याच्या बहाण्याने जवळीक साधून गैरकृत्य करून त्यांची आर्थिक व शारीरिक फसवणूक केली जाते. त्यामुळे लग्नाच्या साईटवर तसेच अन्य सोशल मीडियावर ओळख करताना, संपर्क करताना सावधानता बाळगावी. वैयक्तिक माहिती खात्री झाल्यानंतरच द्यावी. अज्ञात व्यक्तींसोबत वैयक्तिक फोटो शेअर करून नयेत.

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डचा 16 अंकांचा कार्ड नंबर, गोपनीय पिन, सीव्हीव्ही, ओटीपी क्रमांक शेअर करायचा नाही. हे वारंवार माध्यमांमधून सांगितले जाते. मात्र, नागरिकांकडून त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. बँक खात्याविषयी तसेच गोपनीय पिन बँकेकडून कधीही मागितले जात नाहीत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून नागरिकांकडून गोपनीय पिन आणि बँकेची माहिती घेतली जाते. अशिक्षित लोकांसह उच्च शिक्षित देखील यामध्ये फसतात. एटीएमच्या वापरानंतर पावत्या नष्ट कराव्यात. संशयित मेसेज आल्यास त्वरित बँकेशी संपर्क करावा.

सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर वैयक्तिक माहिती, इंटरनेटचा वापर करताना ओळखपत्रांची माहिती देऊ नये. यामुळे सायबर गुन्हेगार आपली माहिती वापरून आपल्या नावाने अनेक गोरखधंदे करू शकतो. कोणत्याही कारणासाठी ओळखपत्र देताना त्यावर प्रत्येक वेळी कारण, तारीख व स्वाक्षरी करावी. लकी ड्रॉ कुपनचा फॉर्म भरताना काळजी घ्यावी. संवेदनशील व खाजगी माहितीचा वापर करताना सार्वजनिक वायफायचा वापर टाळा. सार्वजनिक वायफाय वापरताना व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) वापरावे. सुरक्षित ब्राउजिंगसाठी https असलेली वेबसाईट वापरा. स्मार्टफोनवरील स्वयंचलित वायफाय लॉग इन बंद करा.

इंटरनेट आणि सोशल मीडिया वापरताना नेहमी एक सशक्त पासवर्ड वापरा. पासवर्ड नियमितपणे बदलत रहा. पासवर्ड कोणाशीही शेअर करू नका. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड ठेवा. संगणकासाठी सशक्त अँटीव्हायरस आणि फायरवॉलचा वापर करा.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.