Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या सायकलपटूंनी मोडला बांगलादेशाचा जागतिक विक्रम

एमपीसी न्यूज- आजपर्यंत सायकलवरून जगभ्रमण केल्याच्या, जास्तितजास्त वेळ सायकल चालविण्याचा विक्रम केल्याच्या अनेक बातम्या ऐकल्या असतील. पण हजारो सायकलपटू एका पाठोपाठ एक सरळ रांगेमध्ये सायकल चालवून जागतिक विक्रम केल्याचे उदाहरण क्वचितच पाहायला मिळाले असेल. हुबळी येथील हुबळी सायकलिंग क्लबने हा जागतिक विक्रम करून बांगला देशाच्या विक्रमला मागे टाकले आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या विक्रमामध्ये पिंपरी-चिंचवडच्या सायकलपटूंनी योगदान दिले आहे.

हुबळी येथे हुबळी सायकलिंग क्लबतर्फे हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये एक हजार 235 सायकलपटूंनी सहभाग घेतला. या उपक्रमामध्ये एका पाठोपाठ एक सरळ रांगेमध्ये या सर्व सायकलपटूंनी 4 कि मी पर्यंत सायकल चालवून जागतिक विक्रम केला. हा अत्यंत अवघड प्रकार असून यामध्ये दोन सायकलींमध्ये थोडेसेही अंतर न ठेवता आणि एकदाही आपले पाय जमिनीवर टेकू न देता सायकल चालवायची असते. त्यामध्ये एक सायकलपटू चुकला तरीही यामध्ये सर्व सायकलपटू बाद ठरले जातात. यापूर्वी बांगला देशाच्या एक हजार 186 सायकलपटूंनी 3.2 कि मी सायकल चालवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता.

या विक्रमामध्ये पिंपरी-चिंचवडचे सायकलपटू विकास आणि शीतल साळुंके, संतोष होळी, शंकर गाढवे यांनी आपले योगदान दिले. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसने घेतली आहे.

या विक्रमाबद्दल बोलताना शीतल साळुंके म्हणाल्या, ” या विश्वविक्रमासाठी 2000 सायकलपटूंचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात 1600 सायकलपटूंनी सहभाग घेतला, त्यामध्ये एक हजार 235 सायकलपटूची अंतिम निवड करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.