Pimpri : वक्‍फ बोर्डाची जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांची मागणी

एमपीसी न्यूज – चिंचवडगाव येथील वक्‍फ बोर्डाची जमीन बळकावून त्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी गुरुवारी (दि. 30) पत्रकार परिषदेत केली.

डब्बू आसवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवडगावातील सर्व्हे नं. 287 येथे एक हेक्‍टर 69 आर हे क्षेत्र असून या जागेचे मूळ मालक हमीदाभाई आप्पाबाई दारूवाले व इतर होते. त्यांनी ही जमीन 13 जुलै 1944 रोजी वक्‍फनामा तयार करून बोर्डाला दान केली. हा वक्‍फनामा हवेली सब रजिस्टार कार्यालयात नोंदविला आहे. सातबाऱ्यावर वक्‍फ बोर्डाचे नाव असतानाही बांधकाम व्यवसायिक मे. वैष्णवी कन्स्ट्रक्‍शन भागीदारी फर्मतर्फे पवन रघुमल वाधवानी, कन्हैया मोहनदास रजपूत आणि शासकीय अधिकारी यांनी आपसांत संगनमत करून स्वतःच्या नावे सातबाऱ्यावर फेरफार करून घेतला. फेरफार करताना वक्‍फ बोर्डाचा बनावट ना हरकत दाखला घेतला, असा आरोप आसवानी यांनी केला.

_MPC_DIR_MPU_II

वक्‍फ बोर्डाच्या नियमानुसार वक्‍फ बोर्डाची जमीन विकू शकत नाही किंवा भाड्यानेही देऊ शकत नाही. असे असतानाही मे. वैष्णवी कन्स्ट्रक्‍शन आणि भागीदारांनी आपले नाव सातबाऱ्यावर लावून घेतले. सदरच्या जमिनीवर प्लॉटींग करून त्यांची बेकायदेशीररित्या विक्री केली जात आहे. यामुळे जागा खरेदी करणाऱ्यांची फसवणूक होत आहे. याबाबत आपण शासनस्तरावर पाठपुरावा करीत असून आगामी काळात न्यायालयातही धाव घेणार असल्याचे डब्बू आसवानी यांनी सांगितले.

दरम्यान आसवानी यांच्या या आरोपाबाबत पवन वाधवानी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.