Pimpri: वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी, नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पावसाळा जवळ आला असल्याने पिंपरी-चिंचवडमधील वृक्षांच्या धोकादायक फांद्याची छाटणी तसेच नादुरूस्त पथदिव्यांची दुरूस्ती करण्यात यावी,  अशी मागणी समाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात सतीश कदम यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,  पिंपरी-चिंचवड शहरात वृक्षछाटणी होणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या ठिसूळ झाल्या आहेत. त्या पडण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याअगोदर जोराचा वारा आल्यास  त्या फांद्या खाली पडून झाडाखालून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना इजा करू शकतात अथवा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या वाहनांचे नुकसान करू शकतात. धोकादायक फांद्यामुळे जिवित अथवा वित्त हानी होण्याअगोदर लवकरात लवकर वृक्षछाटणी अभियान राबविणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

शहरात काही ठिकाणी पथदिव्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. काही ठिकाणचे नादुरुस्त अवस्थेतील पथदिवे  बंद आहेत. काही पथदिव्यांच्या वायरी बाहेर आल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी सर्व पथदिव्यांची तपासणी व दुरूस्ती होणे आवश्यक आहे.

पाऊस सुरू झाल्यावर पथदिव्यांची तात्काळ दुरूस्ती होणे अवघड आहे. विद्युत केबल्स उघड्यावर असल्याने शॉक लागून जिवितहानी होण्याचीही भीती आहे. त्यामुळे लवकरात लवकर संपूर्ण शहरातील नादुरूस्त पथदिव्यांच्या दुरूस्तीसाठी व धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी विशेष अभियान राबविण्यात यावे,  अशी मागणी कदम यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.