Pimpri : झोपडपट्यांमधील डाटा संकलित करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरातील झोपडपट्यांमधील पायाभूत नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे पुरविण्यासाठी डाटा संकलित करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली असून त्याबाबत नागरिकांची माहिती संकलित करण्याचा प्रारंभ अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते गवळी माथा वसाहतीमध्ये झाला.
Talegaon Dabhade : विश्वासार्हता आणि पारदर्शक सहकारातून विकास साधता येतो
महानगरपालिका झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभाग आणि शेल्टर असोसिएट्स यांच्या वतीने हे सर्वेक्षण शहरातील आठ झोपडपट्ट्यांमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात येत आहे. त्यातून मिळणा-या माहितीच्या आधारे पायाभूत सेवा सुविधा अधिक सक्षमपणे उभारणे, नागरिकांना वैयक्तिक शौचालयाची उभारणी करणे, जल निसारण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साफसफाई ,आरोग्य वैद्यकीय सेवा, अभ्यासिका सारखे उपक्रम राबवणे याबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
या वस्त्यांमधील प्रत्येक घराला “गुगल प्लस कोड” देणे व वस्त्यांच्या शाश्वत विकासासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. जीआयएस तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक घर क्रमांक देऊन कुटूंबाचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेमध्ये कुटुंबाची प्राथमिक माहिती, घराची स्थिती, शौचालय स्थिती, कचरा व्यवस्थापन, इत्यादी माहिती संकलित केली जाणर आहे.
या वस्त्यांमध्ये अभ्यासिका उभारणे, युवक व युवतींना तांत्रिक शिक्षण देणे, वैद्यकिय व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी या माहितीचा उपयोग करण्यात येणार असल्याने नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.
पहिल्या टप्प्यांमध्ये शहरातील रमाबाई नगर – आकुर्डी, रामनगर-आकुर्डी, गवळीमाथा- भोसरी, संजयगांधीनगर- मोशी, शांतीनगर- भोसरी, शास्त्रीनगर- पिंपरी, काटेवस्ती- दापोडी, संजयनगर-वाखारेवस्ती या आठ झोपडपट्ट्यांमध्ये शेल्टर असोसिएट्स यांचे मार्फत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचा प्रारंभ आज गवळी माथा येथून करण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, उप अभियंता मोहन खोंद्रे, माजी नगरसेवक बाळासाहेब भूंबे, शेल्टर असोसिएट्च्या प्रतिमा जोशी, विकास भूंबे, पांडुरंग आदक, महिला बचत गटाच्या मंगल वाडकर, संगीता कोळेकर, तानाजी दाते, क्षितिज रोकडे उपस्थित होते.