Pimpri: शहरात सर्वत्र कच-याचे ढीग ; सत्ताधारी मलई खाण्यात मश्गूल – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराला स्वच्छतेबाबत ‘बेस्ट सिटी’चा पुरस्कार मिळाला होता. परंतु, दीड वर्षापूर्वी भाजपची सत्ता आल्यानंतर जे शहर महाराष्ट्रात नंबर वन आणि देशात नवव्या क्रमांकावर होते, ते शहर भाजपच्या राजवटीत स्वच्छतेबाबत 43 व्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपचा कारभार नियोजनशून्य असून त्यांचे फक्त मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळेच अद्याप कच-याच्या कामाच्या निविदा निघू शकल्या नाहीत, असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. तसेच शहरात सर्वत्र कच-याचे ढीग साचले असून सत्ताधा-यांनी ‘बेस्ट सिटी’ची ‘वेस्ट सिटी’ केल्याचा आरोपही त्यांनी केला.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात साने यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते. शहराचा विकास हा भविष्यातील 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवून केला होता. शहरातील स्वच्छतेवर जास्त लक्ष देऊन शहराचा चेहरामोहरा बदलला. त्यामुळे आमच्या काळात शहराला ‘बेस्ट सिटी’ पुरस्कार मिळाला; मात्र भाजपाची सत्ता येऊन दीड वर्ष झाली तरी अद्याप कच-यावरची निविदा काढता आली नाही. गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या कच-याचा ठेकेदारांनी कामगारांचे पगार थकवले असून ते कामगारांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत.

महापालिका कामगार कायद्यानुसार त्यांना वेतन देते. परंतू, ठेकेदार कामगाराचे एटीएम कार्ड व पासबुक स्वत:कडे ठेवून महिन्याला सात ते आठ हजारावर त्यांची बोळवण करीत आहेत. कामगारांचा भविष्य निर्वाह निधीही भरला जात नाही. एखादा दिवस कामगार कामावर गेला नाही. तर, भरमसाठ दंड करुन वेतनातून तो कपात केला जातो. त्यांना सुरक्षितेची साधने बूट, ग्लोव्हज हे साहित्य देखील वेळेवर पुरविले जात नाही. पुरविले तर त्याचे पैसे वेतनातून कपात केले जातात. भर पावसात त्या गरीब महिला कामगार महापालिका भवनासमोर आंदोलन करीत आहेत. हे सर्व ठेकेदार भाजपाच्या पदाधिका-यांचेच बगलबच्चे आहेत. त्यामुळे त्यांचे धाडस वाढले आहे. सफाई कामगारांनी आंदोलन केले तरी ते मोडीत काढले जाते.

शहरात ठिकठिकाणी कचरा वेळेवर उतलला जात नसल्यामुळे साथीचे रोगाने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वाईन फ्ल्यू,डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळले असून सत्ताधारी मात्र याकडे कानाडोळा करीत आहेत. भाजपमधील दोन गट एखमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करीत असून यांचे लक्ष फक्त मलईदार विषयांवरच आहे, असा आरोपही साने यांनी केला. येत्या 15 दिवसात कच-याबाबतच्या उपाय योजना केल्या नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.