Pimpri: ‘पवना बंद जलवाहिनीबाबत दुटप्पी वागणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट करावी’

विरोधी पक्षनेते दत्ता साने

एमपीसी न्यूज – पवना बंद जलवाहिनी प्रकल्पाबाबत सत्ताधारी भाजप दुटप्पी वागत आहे. पिंपरी- चिंचवड शहर व मावळात भाजपची परस्परविरोधी भूमिका असून राजकारण करून पवना बंद जलवाहिनी प्रकल्प बंद पाडणारे आता तो प्रकल्प पूर्ण करण्याचे निव्वळ आश्‍वासन देत आहेत. भाजपला राज्यात सत्तेवर येऊन चार वर्षे आणि पालिकेत दीड वर्षे झाले, तरीही हा प्रकल्प प्रलंबित आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली. पाण्यासारख्या महत्वाच्या प्रकल्पावरून जनतेची दिशाभूल न करता, पालकमंत्र्यांसह भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, मावळचे बाळा भेगडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

साने म्हणाले, “पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरदृष्टी ठेवून शहरासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प सुरू केला. याचबरोबर आंद्रा व भामा-आसखेड धरणातून पाणी प्रकल्प सुरू केला. परंतु, सत्ता परिवर्तन झाल्याने या प्रकल्पांना खिळ बसली. भाजप सरकारला 4 वर्षे उलटूनही प्रकल्प अद्याप ‘जैसे थे’ आहे” असे असतानाही पालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे अजित पवार यांच्याविरोधात आपली उंची न पाहता बरळत आहेत”

“भाजपकडे कोणतेही ‘व्हीजन’ नाही. प्रकल्पांमधील मलिदा खाण्यावर त्याचा डोळा आहे. कोणत्याच प्रकल्पावर शहरातील दोन्ही भाजप आमदारांचे एकमत होत नाही. त्यात पालकमंत्र्यांची वेगळीच भूमिका आहे. तर, मावळातील आमदार भेगडे प्रकल्पाच्या विरोधात आहेत. शहर व मावळ भाजपची भूमिका परस्पर विरोधी असून, त्यातून सत्ताधार्‍यांचा दुप्पटीपणा जनतेसमोर आला आहे” अशी टीकाही साने यांनी केली. तसेच पवना बंद जलवाहिनी प्रकल्प पूर्ण होणार किंवा नाही, हे भाजपने जाहीर करावे, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.