Pimpri: दत्ता साने यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार

Datta Sane's funeral in the presence of a few people:दत्ता साने यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार

एमपीसी न्यूज – गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) सकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोजक्या लोकांच्या उपस्थितीत अत्यंसंस्कार करण्यात आले.

निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले. महापौर उषा ढोरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, मनसेचे शहराध्यक्ष नगरसेवक सचिन चिखले, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर यावेळी उपस्थित होते.

संघर्ष करणारे दत्ता साने कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत. आठ दिवसांपासून त्यांचा कोरोनाशी सुरु असलेला लढा आज संपला. सकाळी साने यांनी अखेरचा श्वास घेतला.

गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता गेल्याने शहरवासियांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री राजेश टोपे, खासदार अमोल कोल्हे, पार्थ पवार यांनी समाजमाध्यमांद्वारे साने यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.