Pimpri : पिंपरी-चिंचवड लघु उद्योग भारती संघटनेच्या अध्यक्षपदी दीपक फल्ले, सचिवपदी राहुल खोले तर, खजिनदारपदी प्रताप जाधव

एमपीसी न्यूज – औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील लघु उद्योग भारती संघटनेच्या अध्यक्षपदी उद्योजक दीपक फल्ले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेचे मावळते अध्यक्ष विजय लाटकर यांनी त्यांचे पदाची सूत्रे दीपक फल्ले यांच्याकडे सुपूर्द केली आहेत.

लघु उद्योग भारतीच्या संघटनेच्या सचिवपदी राहुल खोले तर, खजिनदारपदी प्रताप जाधव यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी लघु उद्योग भारतीचे महाराष्ट्र प्रदेश महामंत्री रविंद्र सोनावणे, पुणे विभाग अध्यक्ष रविंद्र प्रभुणे, रा.स्व.संघाचे पिंपरी चिंचवड जिल्हा संपर्कप्रमुख माहेश्वर मराठे,मावळते सचिव धनंजय कुलकर्णी, रमेश बंडगुंडे, राममूर्ती थेवर उपस्थित होते.

अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित अध्यक्ष दीपक फल्ले म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठया प्रमाणात छोटे-मोठे उद्योग विस्तारित झालेले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या उद्योग धोरणा संदर्भात गोष्टींचा उद्योजक आणि कामगार यांना लाभ मिळावा यासाठी पुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे. सध्या सुरू असलेल्या आर्थिक मंदीवर तोडगा काढून उद्योगांना कशाप्रकारे मार्ग काढता येऊ शकेल यासंदर्भात उद्योजकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या सरकारपर्यंत पोहचवून उदयोग पोषक वातावरण राहण्यासाठी काम करणार आहे.

यावेळी सचिव राहुल खोले यांनी सांगितले की, लघु उद्योग भारती संघटनेच्या वृद्धीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन पुढील वर्षभरात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नवरात्री दरम्यान कार्यकारिणीची आणखी विस्तार केला जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.