Pimpri: पालिकेतील लिपिकांच्या बदल्यांचे स्थगिती आदेश रद्द करा – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाने महिन्यापूर्वी नऊ लिपिकांच्या अंतर्गत बदल्या केल्या होत्या. त्यापैकी शिक्षण विभाग आणि करसंकलन विभागातील दोन लिपिक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. बदलीचा आदेश झुगारुन लिपिकांनी राजकीय दबाब टाकून बदलीला स्थगिती आणली आहे. ती स्थगिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात साने यांनी म्हटले आहे की, शिक्षण विभाग आणि करसंकलन विभागातील दोन लिपिक बदलीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. बदलीचा आदेश झुगारुन लिपिकांनी राजकीय दबाब टाकून बदलीला स्थगिती आणली आहे. यावरुन प्रशासन व आपला दुटप्पीपणा उघड झाला आहे. याच पध्दतीने एका कार्यकारी अभियंत्याची बदली रद्द करण्यात आली होती. बदली रद्द करण्याकरिता राजकीय दबाब आणल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल अशी स्पष्ट समज नमूद केलेली असते. तरीसुध्दा राजकीय दबावामुळे सदरच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे.

त्यामुळे ठराविक अधिकारी व कर्मचारी यांना वेगळा न्याय दिला जात असून, याबाबत आपली दुटप्पीपणाची भूमिका स्पष्ट होत आहे. वस्तुत: प्रशासन प्रमूख म्हणून आपण सर्व कर्मचा-यांना समान न्याय देण्याची भूमिका घ्यावयास हवी होती. परंतु, आपण राजकीय दबावामुळे कर्मचा-यांच्या बदल्याबाबत दुजाभाव करुन कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण करीत आहात. त्यामुळे सदर बदल्या स्थगितीचे आदेश रद्द करुन पूर्वीप्रमाणे सदर कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात याव्यात अन्यथा यापूर्वी बाकीच्या कर्मचा-यांच्या झालेल्या बदल्या रद्द करण्यात याव्यात, असे साने यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.