Pimpri: ‘द्रुतगती मार्गावरील ट्रॉमा सेंटरच्या अनधिकृत कामाची चौकशी करा’

खासदार श्रीरंग बारणे यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील ओझर्डे मावळ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा आरोप करत याची चौकशी करण्याची मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बारणे यांनी मुंबई येथे मंत्रालयात शिंदे यांची भेट घेऊन ही मागणी केली. बारणे यांनी म्हटले आहे की, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने अपघात होतात. सर्वाधिक अपघात होणारा हा महामार्ग असून या मार्गावर होणाऱ्या अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना तात्काळ प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळावी या हेतूने राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातुन ट्रॉमासेंटर बाधण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांशी संबंधित ठेकेदाराला हे काम देण्यात आले आहे.

गेले अनेक वर्ष हे ट्रॉमा सेंटर बांधण्यास लागले आहेत. या ठेकेदाराने ट्रॉमासेंटरच्या जागेमध्ये अनधिकृतपणे हॉटेल, फुडमॉल, शॉपींग सेंटर उभे केले आहेत. या ट्रॉमा सेंटरजवळ अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना ने-आण करण्यासाठी हेलीपॅड बांधले असुन हे हेलीपॅड म्हणजे या फुडमॉलची पार्कींगची व्यवस्था झाली आहे.

ट्रॉमासेंटर रूग्णांच्या मदतीसाठी उभारले नसून ठेकेदाराला आर्थिक लाभ व्हावा यासाठी ट्रॉमासेंटरचा उपयोग होतो. या ट्रॉमासेंटरच्या कामामध्ये कोट्यवधी रूपयाचा भ्रष्टाचार झाला आहे. सध्या ट्रॉमासेंटरचा उपयोग रूग्णांच्या मदतीसाठी होत नाही. ठेकेदाराला यातुन लाखो रूपये उत्पन मिळत आहे. ट्रॉमासेंटरची इमारत केवळ दिखावा आहे. अपघातात जखमी झालेल्या रूग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी तात्काळ इतर हॉस्पिटलमध्ये पोहचविणे हा मूळ उद्देश साध्य होत नाही. आजतागायत या हेलीपॅडवर एकही हेलीकॅप्टर उतरले नाही. या हेलीपॅडची जागा फुडमॉलमध्ये येणाऱ्या गाडी पार्कींग साठी होत आहे.

या ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनधिकृत कामाची चौकशी करून यामध्ये झालेली अतिक्रमणे हटविण्यात यावीत. ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.