Pimpri : उध्दव ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची चतुर्भुज प्रतिमा रेखाटून त्यांच्या प्रतिमेचे विद्रुपीकरण केल्याचा आरोप करत याप्रकरणी चित्रकार सचिन जुवाटकर, कार्यक्रमाचे उदघाटक उध्दव ठाकरे व ब.मो. पुरंदरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे.याबाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांना निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे चित्र रंगवून महापुरुषाचे कर्तृत्व संपवायचे हे षडयंत्र आहे. त्यासाठीच त्यांच्या प्रतिमेला दैवत्व बहाल केले जात आहे. उध्दव ठाकरे यांनीही हे चित्र बघुन दैवत्वाचा साक्षात्कार झाला असल्याचे उदगार काढले होते. कार्यक्रमाचे उदघाटन बाबासाहेब पुरंदरे व उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यामुळे चित्रकार सचिन जुवाटकर, उध्दव ठाकरे, पुरंदरे यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने देण्यात आला आहे. निवेदनांवर सतीश काळे, वैभव जाधव, सुमित वाघमारे, जयेश दाभाडे, विनोद घोडके यांच्या स्वाक्ष-या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.