Pimpri: ‘महापालिका आयुक्तांची तात्काळ बदली करा’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील चुकीच्या आर्थिक गोष्टींना समर्थन देणा-या, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणा-या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची तात्काळ बदली करावी. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

बहुजन सम्राट सेनेचे अध्यक्ष संतोष निसर्गंध यांनी याबाबत निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे शहरवासियांनी भाजपला बहुमताने सत्ता दिली. मात्र, पारदर्शक आणि स्वच्छ कारभाराची शहरवासियांची अपेक्षा फोल ठरली. मात्र, महापालिका आयुक्त हर्डीकर हे डोळे झाकून सत्ताधा-यांच्या चुकीच्या गोष्टींना समर्थन देत आहेत. महापालिकेतील आर्थिक गैरव्यवहारात त्यांचाही सहभाग आहे. स्थायी समितीमार्फत ठेकेदारांना हाताशी धरून जादा दराच्या निविदा मंजूर करण्याचा सपाटा लावला आहे.

चिखलीतील संतपीठ इमारत, वडमुखवाडी रस्ता, पंतप्रधान आवास योजना, च-होली – लोहगाव हा 92 कोटीचा रस्ता, अशा असंख्य कामांच्या निविदा जादा दराने मंजूर करून गैरव्यवहार होत आहे. त्यामुळे हर्डीकर यांची तात्काळ बदली करावी आणि खातेनिहाय चौकशी सुरू करावी. अन्यथा 29 जानेवारी रोजी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.