Pimpri: प्राथमिक शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करा, शिक्षक परिषदेची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत आस्थापनेवर असलेल्या प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यानुसार महापालिकेने प्राथिमक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा. सप्टेंबर महिन्याचे वेतन सातव्या आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष संतोष उपाध्ये, जिल्हाध्यक्ष शरद लावंड, सरचिटणीस मंगेश भोंडवे, नथुराम मादगुडे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागून करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामध्ये महापालिका आस्थापनेवरील प्राथमिक शिक्षकांना देखील सातव्या आयोगानुसार वेतनश्रेणी देण्यास मान्यता दिली आहे.

महापालिकेतील प्राथिमक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा. सप्टेंबर महिन्याचे वेतन सातव्या आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार देण्यात यावे. वेतननिश्चिती आणि विकल्प भरुन घेणे ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यासाठीची आवश्यक कार्यवाही तत्काळ सुरु करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. वेतननिश्चितीची प्रक्रिया आत्ताच सुरु केल्यास प्राथिमक शिक्षकांना सप्टेंबर महिन्याचे वेतन सातव्या आयोगाप्रमाणे मिळणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.