Pimpri :’….अन्यथा आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवणार !’

महापालिकेच्या शाळांमधून शिक्षक भरती करण्याची अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांची मागणी

 

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या माध्यमिक विभागाला 50 शिक्षकांची गरज असताना भरती प्रक्रिया राबविण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांचा संताप सहन करण्याची वेळ लोकप्रतिनिधींवर आली आहे. येत्या आठ दिवसांत शाळांच्या मागणीनुसार शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अन्यथा आयुक्त कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करण्याचा इशारा अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी दिला आहे.

बारणे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेच्या 18 माध्यमिक विद्यालयांमध्ये 50 शिक्षकांची कमतरता भासत आहे. याबाबत जून 2018 पासून शिक्षण विभागाला माहिती मागितली असता ती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. पालिकेच्या शाळेमध्ये गोरगरिबांची मुले शिक्षण घेतात. चालू शैक्षणिक वर्षातील तीन महिन्यांचा कालावधी संपला तरीही, विद्यालयात शिक्षक रुजू झाले नाहीत. आणखीन विलंब झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.

मानधन तत्वावर पन्नास शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी शिक्षण विभागाने जाहिरात प्रसिध्द केली. उमेदवारांचे अर्जही घेण्यात आले. मेरिटनुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यात हस्तक्षेप होऊ लागल्याने ही भरती प्रक्रीया रखडते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. आठ दिवसांत शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी. अन्यथा पालिकेतील आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर विद्यार्थ्यांची शाळा भरवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बारणे यांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.