Pimpri: दिव्यांग कल्याणासाठी विद्यार्थी पासच्या नियमावली बदल करा, युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी पिंपरी महापालिकेच्या नागरवस्ती विभागाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे विद्यार्थी पीएमपीएमएलच्या पासपासून वंचित राहतात. त्याकरिता दिव्यांगासाठी असलेल्या नियमावलीत बदल करत विद्यार्थ्यांच्या बस पास संदर्भात असलेल्या कागदोपत्री अडचणी दूर कराव्यात अशी मागणी युवक काँग्रेसने महापालिकेकडे केली आहे.

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांची भेट घेतली. निखिल भोईर, युनूस बागवान, सिध्दार्थ वानखेडे, हिराचंद जाधव, अनिल सोनकांबळे, सुभाष वाघमारे, दिव्यांग विद्यार्थी गीतेश चौधरी, बळीराम धराडे, बालाजी सूर्यवंशी, शंकर भोईटे, शिवकुमार कांबळे यावेळी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका अपंग कल्याणकारी योजनेअंतर्गत नागरवस्ती विभागाकडून दिव्यांग विद्यार्थ्यांना पीएमपीएमएल पाससाठी सवलत दिली जाते. दिव्यांग विद्यार्थी बस पास सवलतीसाठी नागरवस्ती विभागाकडून अतिरिक्त कागदपत्रांची मागणी केली जाते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अत्यावश्यक असणारी बस पास सवलत नाकारली जात आहे. याबाबत दिव्यांग बांधवांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.

नागरवस्ती विभागाकडून मागणी होत असलेले रहिवासी पुराव्याबाबतचे रेशन कार्ड, लाईट बिल व नोटरी-शपथपत्र न मागता संबंधित विद्यार्थ्यांचे संगोपन करणा-या संस्थेचे पत्र, महाविद्यालयाचे बोनाफाईड, ओळखपत्र किंवा नोकरी करत असल्यास कंपनीचे ओळखपत्र ग्राह्य धरून बस पास मिळावेत, अशी मागणी बनसोडे यांनी केली. या मागणीला अतिरिक्त आयुक्त पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.