Pimpri : ‘त्या’ क्रीडा शिक्षकांना महापालिका सेवेतून मुक्त करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 18 क्रीडा शिक्षक गेली अनेक वर्षे निवडणूक विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची वाणवा आहे. या शिक्षकांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करावे, अशी मागणी क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी केली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकांची कमतरता भासत आहे. महापालिकेचे 18 क्रीडा शिक्षक गेली अनेक वर्षे निवडणूक विभागात कार्यरत आहेत. महापालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षापासून महापौर चषक स्कुलोत्सव स्पर्धा घेण्याचा क्रीडा विभागाचा मानस आहे. त्या दृष्टीने स्कुलोत्सव ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळेतील खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतील.

महापौर चषक स्पर्धेचा लाभ हा याच शहरातील खेळाडूंना मिळावा यासाठी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या क्रीडा शिक्षकांची गरज आहे. परंतु, शिक्षक उपलब्ध नसल्याने मुले आपली गुणवत्ता दाखवू शकत नाहीत. 23 ऑगस्ट 2019 रोजीच्या महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या निर्णयानुसार क्रीडा मार्गदर्शकांची मानधनावर नेमणूक केली आहे. त्यामुळे पूर्वीच्या क्रीडा शिक्षकांना महापालिकेतून सेवामुक्त करुन त्यांना निवडणूक विभागाकडे पाठवावे. तसेच मानधनावर क्रीडा शिक्षकांची नेमणूक करावी, अशी मागणी क्रीडा, कला व सांस्कृतिक समितीचे सभापती तुषार हिंगे यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.