Pimpri: पालखी सोहळ्यासाठी सोयी-सुविधा पुरवा – दत्ता साने

एमपीसी न्यूज – जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आगमनाच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील पालखी मार्गाची पाहणी करण्यात यावी. सोहळ्यासाठी सर्व सोयी-सुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.

संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान 24 जून रोजी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे 23 जून रोजी प्रस्थान होत आहे. गेल्या 30 वर्षांपासून संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातून जाते. यावर्षी 25 जूनला हा पालखी सोहळा शहरात दाखल होणार आहे. पालखीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात असतो. त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात.

यावर्षी पालखी ज्या मार्गावरुन जाणार आहे. त्या मार्गावर शहराचे प्रवेशव्दार निगडी येथील भक्ती-शक्ती चौकामध्ये उड्डाणपुलाचे तसेच केबल टाकण्याचे काम चालू आहे. त्यामुळे या चौकामध्ये रस्ते अरुंद झाले आहेत. पिंपरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, मोरवाडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते दापोडीपर्यंत मेट्रोचे काम चालू आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आल्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अजून अरुंद झाला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड हद्दीतील संपूर्ण पालखी मार्गाची पाहणी करुन वारक-यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी साने यांनी केली आहे. याबाबत महापालिका महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.