BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी जाहीर करा

भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांची महापौरांकडे मागणी

एमपीसी न्यूज – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची यंदाची 100 वी जयंती आहे. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त शहरात प्रबोधन, प्रसार, प्रचारार्थ असे विविध उपक्रम राबविण्यासाठी 50 लाख रुपये जाहीर करण्याची मागणी भाजप नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत महापौर राहुल जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका गोरखे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे दरवर्षी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंची 100 वी जयंती आहे. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या मूल्यांचा प्रबोधन, प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी महापालिकेने 50 लाख रुपयांचा निधी उपलबध करुन देण्यात यावा.

अण्णाभाऊ साठे यांनी अनुभवातून समृद्ध शिक्षण घेतले. त्यांनी अर्धवट शिक्षण घेऊन देखील इतर सुशिक्षित साहित्यिकांच्या तोडीसतोड साहित्य निर्माण केले. अण्णाभाऊ एक कृतिशील समाजसुधारक होते. विविध कथा, कांदब-या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्ये, गीते अशा विविध क्षेत्रात त्यांनी सहजरित्या पादाक्रांत केली आहेत. आपल्या साहित्यातून शोषण, अन्याय, अत्याचाराला विरोध करणे हेच त्यांनी ध्येय मानले. मानवी वृत्ती, प्रवृत्तीचे वास्तव दर्शन वाचकांना घडविले.

शब्दांना अंगाराचे रुप देऊन दलितांच्या निर्जीव मनाला चेतवत अण्णाभाऊ मराठी साहित्यातील अढळ पदावर विराजमान झाले आहेत. जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचा शहरात प्रसार करण्यासाठी महापालिकेने 50 लाख रुपयांचा निधी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका गोरखे यांनी निवेदनातून केला आहे.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3