Pimpri: पिंपरी आरपीआयला सोडण्याची मागणी, भोसरीवर शिवसेनेचा दावा

चिंचवडमधून भाजप प्रदेशाध्यक्षांना लढण्याची गळ

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ सोडण्याची आरपीआयने मागणी केली आहे तर, भोसरी मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला आहे. तिसरीकडे सत्ताधारी भाजपमधील गटबाजी उफाळून आली असून चिंचवड मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच निवडणूक लढविण्याची गळ भाजप नगरसेवकाने घातली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.

आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. दहा ते बारा दिवसात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे शहरात दौरे वाढले आहेत.

पिंपरी मतदारसंघात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार आमदार आहेत. 2014 ची निवडणूक शिवसेना स्वतंत्र लढली. तर, भाजप आणि आरपीआयची युती होती. भाजपने हा मतदारसंघ आरपीआयला सोडला होता. आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी निवडणूक लढविली होती. परंतु, त्यांचा थोड्या मतांनी पराभव झाला होता.

आता शिवसेना-भाजप-आरपीआय युती आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार असल्याने मतदारसंघ शिवसेनेलाच सुटण्याची शक्यता असताना आरपीआयने पिंपरीवर दावा केला आहे. आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पिंपरी आरपीआयला सोडण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कोणाला सुटतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भोसरी मतदारसंघाचे अपक्ष आमदार महेश लांडगे भाजप संलग्न आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटू शकतो. परंतु, शिवसेनेने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. उमेदवारी कुणालाही द्या. पण, चिन्ह धनुष्यबाण आणि उमेदवार शिवसेनेचाच असावा, अशी मागणी शुक्रवारी (दि. 30) उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. शिवसेनेत देखील पक्षाअंतर्गत धुसफूस सुरु झाली आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपमधील गटबाजी उफाळून आली आहे. भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप आमदार असलेल्या चिंचवड मतदारसंघातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाच निवडणूक लढविण्याची गळ भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी घातली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून आगामी काळात मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.