Pimpri : मोफत पाठ्यपुस्तके न देणा-या शाळांवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – मोफत शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) अंतर्गत प्रवेश मिळवणा-या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक न देणा-या शाळा व शिक्षण विभागातील अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी, पिंपरी-चिंचवड वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र साळवे, विनोद सरवदे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत अतिरिक्त आयुक्‍त संतोष पाटील यांना निवेदन दिले आहे. यावेळी, विष्णू सरपते, विनोद क्षीरसागर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पहिल्या टप्प्यातील प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या हाती काही शाळांनी शालेय साहित्य व पुस्तके मिळणा-या दुकानांची यादी देण्यास सुरुवात केली आहे. आरटीई अंतर्गत प्रवेश आर्थिक दृष्ट्या कुमकवत असलेल्या नागरिकांच्या मुलांना दिला जातो.

गरीब पालकांसाठी मोठ्या शाळांच्या शालेय साहित्य व पुस्तकांचा खर्चही आवाक्‍याबाहेरचा आहे. अशा पालकांनाही शाळा दुकानांमधून शालेय साहित्य खरेदी करण्यास सांगत आहेत. मात्र, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळविणा-या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचा कायदा असतानाही अनेक शाळा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देताना पालकांकडून पैसे घेत असल्याचे प्रकार दरवर्षी घडत आहेत.

याबाबत वारंवार तक्रारी करुनही शिक्षण विभागामार्फत कोणतीही दखल घेतली जात नाही. यामुळे, आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणा-या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.