Pimpri: ‘शिक्षक भरतीच्या जाहिरातीत नियमाचे उल्लंघन; सुधारित शुद्धीपत्रक काढा’

आमदार गौतम चाबुकस्वार यांची आयुक्तांना सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मानधन तत्वावर 105 शिक्षकांना घेण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये राज्य सरकारच्या नियमाचे उल्लंघन झाले आहे. अटी-शर्तींमधील मागासवर्गीय उमेदवारांसाठीची वयोमर्यादा चुकीची दर्शविली आहे. त्यामुळे मागासवर्गीय उमेदरांवार अन्याय होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने तातडीने सुधारित शुद्धीपत्रक काढावे. अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ द्यावी, अशी सूचना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

याबाबत आमदार चाबुकस्वार यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 106 प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सुमारे 40 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे. शिक्षण विभागातर्फे मानधन तत्वावर 105 शिक्षकांची भरती केली जाणार आहे. महापालिकेने त्याची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. परंतु, अर्ज करणा-या उमेदवारांसाठीच्या अटी-शर्ती नमूद करताना मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 38 दर्शविली आहे. ही वयोमर्यादा चुकीची आहे.

राज्य सरकारच्या 17 ऑगस्ट 2004 च्या सुधारित अध्यादेशानुसार मागासवर्गीय उमेदवारांची वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत करण्यात आली आहे; मात्र पिंपरी महापालिका शिक्षण विभागाने जाहिरातीमध्ये ही मर्यादा 38 केली आहे. त्यामुळे महापालिकेने राज्य सरकारच्या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने सुधारित शुध्दीपत्रक काढावे. अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार चाबूकस्वार यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.