Pimpri : संतपीठाच्या कामात सहा कोटीचा भ्रष्टाचार, नव्याने निविदा काढा – दत्ता साने

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिखली येथे उभारण्यात येणा-या संतपीठाच्या कामामध्ये रिंग झाली आहे. त्यामध्ये सहा कोटीचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी करुन ठेकेदाराचे काम रद्द करण्यात यावे. नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे. महापालिका आरक्षणे ताब्यात घेऊन विकत असल्याचा आरोप करत शेतक-यांनी आरक्षणाचा महापालिकेला ताब देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.

महासभेत विषयपत्रिकेवरील प्रत्येक विषयाचे वाचन न करता महापौरांनी एक ते बारा विषय मंजूर करण्यात आल्याचे जाहीर केले. अशा प्रकारे विषय मंजूर करणे घटनाबाह्य आहे. हे विषय महासभेने मंजूर केले. तरी त्याची आयुक्तांनी अंमलबजावणी करु नये, अशी मागणी करत साने म्हणाले, भाजपने महापालिकेचे व्यावसायिकरण केले आहे. संतपीठाच्या कामातील ठेकेदारांच्या संभाषणावरुन रिंग केल्याचे सिध्द होत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.

महापौरांनी कामकाज रेटून नेऊन 133 नगरसेवकांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. भाजपला असाच कारभार करायचा असेल तर महापालिका ‘बीओटी’ तत्वावर चालविण्यास द्यावी, असेही साने म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.