Pimpri : संविधान भवनाच्या कामाला गती द्या; आमदार लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पाच एकरावर देशातील पहिले संविधान भवन साकारण्यात येणार आहे. त्याच्या कामाला गती देण्याची विनंती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार लांडगे यांनी संविधान भवनाच्या कामाला गती देण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना या कामामध्ये तातडीने लक्ष घालण्याचे निर्देश दिले आहेत.

औद्योगिकनगरीत देशातील पहिले संविधान भवन साकारण्यास चालना मिळाली आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा सुरु आहे. संविधानाविषयी प्रत्येक भारतीयाला साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीतील पहिले ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या मोकळ्या भूखंडावर हे ‘संविधान भवन’ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने जागा देखील देऊ केली आहे.

संविधान साक्षरता म्हणजे सृजनशील व सुसंस्कृत समाज व सृजनशील व सुसंस्कृत समाज म्हणजे सशक्त भारत, त्यामुळे हे भवन भारतातील पहिले संविधान भवन असणार आहे. त्याचा मान हा आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळेल. याचा सकारात्मक दृष्टीने विचार करुन देशातील पहिले संविधान भवन उभारण्याला चालना द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान भवन होणे महत्वाचे असून त्याबाबतची ‘फाईल’ तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिका-यांना दिले असल्याचे, आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

संविधान भवनाची वैशिष्ट्ये

संविधान अभ्यास केंद्र असणार आहे. त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा घेतल्या जातील. याशिवाय इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी उपलब्ध असतील. ‘ई’ -लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू, चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु केले जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.