Pimpri: ‘शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करा, पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम पुन्हा सुरु करा’

अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामावरील शास्तीकर पूर्वलक्षी प्रभावाने माफ करण्यात यावा. पीसीएनटीडीएच्या बांधकाम नियमितीकरणाच्या जाचक अटी शिथील करुन अल्प दंड आकारुन घरे नियमित करावीत. पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेचे काम सुरु करावे, अशी मागणी पिंपरी महापालिकेतील अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

मुंबईत मंत्रालयात बारणे यांनी मंगळवारी अजित पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निवेदन दिले. त्यात बारणे यांनी म्हटले आहे की, औद्योगिकनगरीत कामगार, गोरगरिबांनी मोलमजुरी करुन पै-पै जमा करुन घरे बांधली आहेत. अर्धा गुंठा जागेवर घरे बांधली आहेत. त्या अनधिकृत बांधकामावर शास्तीकर लादण्यात आला आहे. हा शास्तीकर घर, जागेच्या किमतीच्या पुढे गेला आहे. त्यामुळे नागरिक अस्वस्थ व मानसिक दडपणाखाली आहे. अवैध बांधकामांचा सरसकट शास्तीकर माफ करावा. कर्ज काढून शास्तीकर भरलेला आहे. त्यांना तो परत करावा.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी शिथिल करण्यात याव्यात. कमी दंड आकारुन अनधिकृत घरे नियमित करण्यात यावीत. कामगारांची अल्प दरात निवा-याची सोय व्हावी या उद्देशाने 45 वर्षापुर्वी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. परंतु, प्राधिकरणाचे आपल्या क्षेत्रावर नियंत्रण नाही. निवा-याची सोय म्हणून नागरिकांनी घरे बांधली आहे. त्यातील जाचक अटी-शर्ती शिथील करुन अल्प दंड आकारुन प्राधिकरण हद्दीतील घरे नियमित करावीत.

शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाण्याची मागणी देखील वाढली आहे. वाढत्या व विकसनशील शहराला मुबलक आणि स्वच्छ पाणी पुरवण्याची गरज लक्षात घेता पवना बंदिस्त जलवाहिनी योजनेचे काम पुन्हा सुरु करावे, अशी मागणी बारणे यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.