Pimpri : उद्यमनगर येथील बंद केलेल्या ‘एसआरए’ प्रकल्पाचे काम सुरु करा

एमपीसी न्यूज – प्रभाग क्रमांक 9 मासुळकर कॉलनीमधील उद्यमनगर येथील आरक्षण क्र 79 या जागेवरच यशवंतनगर झोपडपट्टी पुनर्वसन ‘एसआरए’ प्रकल्प व्हावा. प्रकल्पाचे बंद केलेले काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीने महापालिकेकडे केली आहे. कोणत्याही राजकीय दबावाला न जुमानता गोरगरिबांसाठी असलेला गृहप्रकल्प पूर्ण करण्याची विनंती शिष्टमंडळाने केली आहे. दरम्यान, पुर्नवसन प्रकल्प पूर्ण होणारच अशी ग्वाही आयुक्तांनी दिल्याचे आंदोलकांनी सांगितले.

कृती समितीच्या शिष्टमंडळाने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांची भेट घेत, मागण्यांचे निवदेन दिले. यावेळी यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष अविनाश चौधरी, शिवशंकर उबाळे, फारूक कुरेशी,अल्ताफ शेख, प्रवीण कांबळे, अजीज शेख, सविता गायकवाड, ज्योती चौधरी, सीमा खरंगुळे, जीलानी सय्यद, सुरेश रोकडे, अवी लोंढे विविध संघटनांचे पदाधिकारी व यशवंतनगर झोपडपट्टीमधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

दोन दिवसांपूर्वी उद्यमनगर बचाव समितीच्या वतीने यशवंतनगर झोपडपट्टी एसआरए अंतर्गत पुनर्वसन प्रकल्प व पंतप्रधान आवास योजना या दोन्ही प्रकल्पाला विरोध करीत हे प्रकल्प इतर ठिकाणी स्थलांतर करण्याची मागणी केली होती. त्यानंतर महापालिका प्रशासनाने यशवंतनगर झोपडपट्टी एसआरए पुनर्वसन प्रकल्पाच्या कामाला 25 मे पर्यंत तात्पुरती स्थगिती दिली होती. त्याच्या दुस-याच दिवशी या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढून प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

”हा गृहप्रकल्प झोपडपट्टी धारकांच्या मुलभूत निवारा होणार आहे. यामुळे गरीबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. कायदेशीरबाबींची पूर्तता करुनच प्रकल्प करण्यात येत आहे. केवळ उच्चभ्रू वसाहत शेजारी असल्याने, कोणतेही ठोस कारण नसताना गोरगरींबाच्या गृहप्रकल्पाला विरोध करणे चुकीचे आहे. हा प्रकल्प आमच्या जिव्हाळ्याचा आहे. आम्हालाही उच्चभ्रू जीवनमान जगता यावे. यासाठी गृहप्रकल्पाला विरोध सोडून प्रकल्प जलदगतीने पूर्ण व्हावा या साठी सर्वांनी सहकार्य करावे”, असे आवाहन यशवंतनगर पुनर्वसन कृती समितीचे अध्यक्ष अविनाश चौधरी यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.