Pimpri : खुले रिक्षा परमिट देणे बंद करा, छावा मराठा संघटनेची आरटीओकडे मागणी

एमपीसी न्यूज- पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देण्यात येत असलेल्या खुल्या परमिटमुळे रिक्षा चालकांचा धंदा कमालीचा कमी झाला आहे. खुले परमिट असेच सुरू राहिल्यास कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांप्रमाणे रिक्षाचालकांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल. त्यामुळे आरटीओने खुले परमिट देणे बंद करावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा छावा मराठा संघटनेचे शहर व पुणे जिल्हाध्यक्ष रामभाऊ जाधव यांनी दिला आहे.

राम जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे व बसनंतर रिक्षा व्यवसायाचा समावेश आहे. शहरांतर्गत प्रवास करण्यासाठी हा सर्वाेत्तम पर्याय आहे; परंतु शासनाचे धोरण आणि आरटीओसह वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे रिक्षा व्यवसाय ही समस्या बनू लागली आहे. परवाने खुले केल्यामुळे नवीन रिक्षा घेण्याची स्पर्धा सुरू झाली व नवीन रिक्षा रस्त्यावर आल्या आहेत.

यामुळे या व्यवसायामधील स्पर्धा वाढली आहे. परिणामी व्यवसाय कमी होऊ लागला आहे. रिक्षा स्टँडवर लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. भाडे मिळविण्यासाठी रिक्षा चालकांना ताटकळत बसावे लागते आहे. कर्ज काढून घेतलेल्या रिक्षा फायनान्स कंपनी ओढून नेत आहे. त्यामुळे बेरोजगारांसाठी रोजगार देण्यासाठी फायदेशीर योजना युवकांना पुन्हा बेरोजगारीच्या गर्तेत टाकत आहे.

शासनाने परवाने खुले केल्यामुळे शहरातील रिक्षांची संख्या वाढली आहे. रिक्षांची संख्या वाढली; पण रिक्षास्टँड तेवढेच असल्यामुळे रेल्वेस्थानक, बसस्थानकासह प्रमुख चौकांमध्ये वाहतूककोंडीत भर पडली आहे. अनेक ठिकाणी पूर्ण रस्त्यावर रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बेशिस्तपणा करणारे काही चालक रांगेचा नियम पाळत नाहीत. यामुळे शाब्दिक चकमक व मारामारीच्या घटनाही घडू लागल्या आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अद्यापही नवीन परवाने देण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रिक्षांची वाढती संख्या ही सर्वांसाठीच डोकेदुखी बनत चालली आहे. वाहतूककोंडी, पार्किंगपर्यंत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेकांनी रिक्षा परवाने घेऊन ते चालविण्यासाठी लायसन्स व बॅच नसलेल्यांना दिले आहेत. टपोरी मुले रिक्षा चालवत असून, ते प्रवाशांबरोबरही उद्धट वर्तन करत आहेत. या बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरटीओ दुर्लक्ष करत आहे. वेळेत ही समस्या सोडविली नाही, तर भविष्यात रिक्षाचालकांमध्ये व प्रवाशांबरोबर वाद वाढून मारामारीचे गंभीर गुन्हे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आरटीओने खुले रिक्षा परमिट देणे बंद करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही राम जाधव यांनी दिला आहे, असेही जाधव यांनी पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.