Pimpri : महापालिकेच्या नवीन इमारतीची निविदा प्रक्रिया त्वरित थांबवण्याची संजोग वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आय टू आर अंतर्गत प्राप्त झालेल्या जमिनीवर महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधली जाणार आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काही ठराविक नेत्यांच्या दबावाखाली येऊन हा विषय मनमानी पद्धतीने रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत या कामाची निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनामध्ये संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे की, नवीन प्रशासकीय इमारत पुढील 50 वर्षांचा विचार करून बंधने अपेक्षित आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख राजकीय पक्षाच्या व्यक्तींसह सामाजिक कार्यकर्ते, शहराच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या व्यक्तींचा विचार होणे गरजेचे आहे. मात्र महापालिकेत सत्ताधारी असलेल्या काही ठराविक नेत्यांच्या दबावाखाली येऊन हा विषय मनमानी पद्धतीने रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महापालिकेची नवीन इमारत सहाराच्या शिरपेचात तुरा खोवणारी ठरावी. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त असावी तसेच या इमारतीमधील सर्व गोष्टी प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने योग्य पद्धतीने असाव्यात अशी आम्ही मागणी केली आहे. या शिवाय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर या इमारतीचे सादरीकरण करावे. त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी सूचना करण्यात आली होती. या इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व अण्णासाहेब मगर यांचे पुतळे उभे करावेत अशीही आमची मागणी होती. परंतु, कोणताही बदल न करता इमारतीचे सादरीकरण न करताच निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

ही निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी सादरीकरण केल्यानंतर अपेक्षेत बदल केल्यानंतरच इमारतींबाबत पुढील निर्णय घ्यावा अन्यथा शासनाकडे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली जाईल. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संजोग वाघेरे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.