Pimpri: शहर अभियंता अंबादास चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील ‘रिंग’ झालेल्या 360 निविदा गैरव्यवहाराला शहर अभियंता अंबादास चव्हाण हेच जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यासह या निविदा प्रक्रियेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करावे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या आर्थिक वर्षात मुख्यालयात आणि आठ प्रभाग कार्यालयांमार्फत स्थापत्य विषयक, प्रभाग स्तरावरील कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आल्या होत्या. त्यात प्रामुख्याने काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक- रंगीत रबर मोल्डेड पेव्हिंग ब्लॉक बसविणे, स्टॉर्म वॉटर लाईन करणे, चर दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण-मजबुतीकरण दुरुस्तीकाम करणे, पावसाळी गटर्स करणे, फुटपाथची दुरुस्ती, महापालिका मालकीच्या इमारतींची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी, नदी-घाट विकसित करणे, शौचालय बांधणे, उद्यान नूतनीकरण, स्ट्रीट फर्निचर बसविणे आदी कामांचा यात समावेश होता. ही सर्व कामे 10 लाख ते 40 लाखांच्या रक्कमेची होती.

या कामांच्या निविदा प्रक्रियेत अधिकारी, ठेकेदार, नगरसेवक यांनी संगनमत करत ‘रिंग’ करून निविदा भरल्या आहेत. एकमेकांच्या संगणकावरून निविदा भरणे, एकाच खात्यातून इतर ठेकेदारांच्या अनामत रक्कमेचा ड्राफ्ट काढणे, प्रतिस्पर्धी ठेकेदाराचा पत्ता एकच असणे, किमान तीन निविदा आल्याचे भासवण्यासाठी बोगस निविदाधारक उभा करणे, त्यासाठी त्याला कागदपत्रे पुरविणे आदी गैरप्रकार समोर आले.

‘रिंग’ झालेल्या 360 निविदाप्रकरणासह शहर अभियंता व संबंधित अधिकारी मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेऊन गेले दीड वर्षे करदात्या नागरिकांच्या तिजोरीवर दिवसाढवळ्या दरोडे घालत आहेत. या गैरव्यवहाराला सर्वस्वी जबाबदार असणारे शहर अभियंता अंबादास चव्हाण, या प्रक्रियेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांना निलंबित करावे. मागील दीड वर्षातील अशा सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भापकर यांनी केली आहे. याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.